श्रीगोंदयात अल्पवयीन मुला – मुलीचा बालविवाह

श्रीगोंदा तालुक्यातील एका गावात खळबळ उडवून देणारी घटना घडली असून , बारा वर्षांची मुलगी आणि चौदा वर्षांच्या मुलाचा विवाह लावून दिल्याची घटना घडल्याचे समोर येत आहे . याबाबत मुलीच्या आईने तक्रार देण्यासाठी पोलिसांत धाव घेतली आहे . रात्री उशिरापर्यत याबाबत कुठल्याच गुन्ह्याची नोंद झाली नव्हती . दरम्यान , लग्न लावून देण्यासाठी एक ते दीड लाख रुपयांचा व्यवहार झाला असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे . याबाबत अधिक माहिती अशी की , ३० नोव्हेंबर रोजी काष्टी येथील बारा वर्षीय मुलगी व ढवळगाव येथील चौदा वर्षीय मुलाचा विवाह होणार होता . स्थानिक ग्रामसेवक व इतर मंडळीनी जाऊन हा विवाह रोखला . हा विवाह होणार नाही , याची लेखी हमी घेतल्यानंतर शासकीय यंत्रणा तिथून निघून आली . त्याच दिवशी रात्रीच्या दरम्यान ‘ ती ‘ बारा वर्षीय मुलगी व ‘ तो ‘ चौदा वर्षीय मुलगा यांचा ढवळगाव येथे विवाह लावून देण्यात आल्याचे समोर येताच मुलीच्या आईने पोलिसांत धाव घेतली . मात्र , पोलिसांनी त्यास प्रतिसाद दिला नाही . सदर अल्पवयीन मुलगी – मुलगा यांचा विवाह श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगावात पार पडल्याची   माहिती अहमदनगरच्या चाईल्ड लाईन संस्थेस समजल्यानंतर त्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा सुरू केला . संबंधितांना बाल कल्याण समितीसमोर हजर राहण्यास कळवूनही कुणीच हजर न झाल्याने ही घटना उघड झाली आहे . दरम्यान , हा विवाह पार पाडण्यासाठी एक ते दीड लाख रुपयांचा व्यवहार झाल्याचे समोर आले आहे . याबाबतची सत्यता पोलिस तपासात समोर येईल . याबाबत फिर्याद दाखल करण्यासाठी मुलीची आईने बेलवंडी पोलिसात धाव घेतली असून याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता . गुन्हा दाखल होईल पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव म्हणाले , या बालविवाहाबाबत आपण माहिती घेतली असून , याबाबत बेलवंडी पोलिसांना कळविण्यात आले आहे . मुलीच्या आईच्या तक्रारीनंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे .