श्री नवनाथ पायी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान
ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात निमगाव वाघाच्या वेशीबाहेर पडली दिंडी गावात रंगला रिंगण सोहळा
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील श्री नवनाथ पायी दिंडीचे ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात व टाळ मृदंगाच्या गजरात श्री क्षेत्र पंढरपूरकडे नुकतेच प्रस्थान झाले. गावात भक्तीमय वातावरणात डोळे दिपवून टाकणारा रिंगण सोहळा पार पडला. या दिंडीत कल्याणच्या भाविकांसह गावाच्या पंचक्रोशीतील वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. दिंडीतील भव्य रथाचे गावात जागोजागी स्वागत करुन भाविकांनी पादुकांच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.
गावाच्या वेशीबाहेर दिंडी पडताना स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने वीणेकरी ह.भ.प. राम महाराज जाधव, ह.भ.प. विठ्ठल महाराज खळदकर, कल्याणचे ह.भ.प. धुंडा महाराज म्हसकर, पायी दिंडी सोहळा ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ डोंगरे व सचिव लक्ष्मण चौरे यांचा संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे यांनी सत्कार करुन वारीसाठी शुभेच्छा दिल्या.
रथासमोर पै.डोंगरे यांच्या हस्ते नारळ वाढवून दिंडीचे प्रस्थान झाले. यावेळी माजी सरपंच साहेबराव बोडखे, डॉ. विजय जाधव, गोकुळ जाधव, अनिल डोंगरे, भागचंद जाधव, नामदेव फलके, अजय ठाणगे, नामदेव भुसारे, पिंटू जाधव, भरत बोडखे, भाऊसाहेब जाधव, गोरख फलके, मयुर काळे, सुनिल जाधव, नवाब शेख, गुलाब जाधव, चंदू जाधव, बन्सी जाधव आदींसह ग्रामस्थ, महिला वर्ग व भजनी मंडळातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी दिंडीचे प्रमुख वै. ह.भ.प. जयसिंग महाराज मडके व विश्वस्त सदाशिव बोडखे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. या दिंडी प्रस्थान कार्यक्रमात निमगाव वाघा आरोग्य केंद्राचे मनोहर गायकवाड, दिपाली कदम व किशोर काळे यांनी वारकर्यांसाठी औषधी किटची भेट दिली. तर श्याम जाधव यांच्या वतीने वारकर्यांना साहित्य ठेवण्यासाठी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.
दिंडीमध्ये सुमारे अडीचशे महिला, पुरुष भाविक सहभागी झाले आहेत. दिंडीच्या अग्रभागी वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोष करणारे झेंडेकरी, पांढर्या पोशाखात सहभागी भाविक, भजनी मंडळी, फुलांनी सजवलेले रथ व डोक्यावर तुळशी, कळस घेतलेल्या महिला वारीसाठी निघाल्या आहेत. श्री नवनाथ पायी दिंडी केडगाव, अरणगाव, वाळकी, रुईछत्तीसी मार्गे पंढरपुरला जाणार आहे. दिंडीत दररोज हरिपाठ, भारुड, किर्तन व प्रवचनांच्या कार्यक्रमांचा समावेश आहे.