संत शेख महंमद महाराजांची पालखी जाणार पंढरपूरला

शहरासह तालुक्यात आध्यात्मिक वारसा असून श्रीगोंदाचे ग्रामदैवत श्री संत शेख महंमद महाराजांची पालखी येणाऱ्या आषाढी एकादशीसाठी १९ ते २७ जून या दरम्यान  श्रीगोंदा ते पंढरपूर अशी प्रथमच निघणार असल्याची माहिती पालखी सोहळा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. श्री संत शेख महंमद महाराज हे संत तुकाराम महाराजांचे समकालीन संत आहेत. शेख महंमद महाराज आणि संत तुकाराम दोघांचेही दैवत पंढरपूरचा पांडुरंग असून राज्यातील संतांच्या मांदीआळीत श्रीगोंद्याच्या शेख महंमद महाराजांचे स्थान अतिशय उच्च आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्यासह संत परंपरेतील सर्व संतांचे पंढरपूर पालखी सोहळे कित्येक वर्षांपासून सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर पंढरीच्या पांडुरंगाची आणि शेख महंमद यांची भेट घडवून आणण्यासाठी १९ ते २७ जून या कालावधीत श्रीगोंदा ते पंढरपूर पालखी सोहळा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती देत संत तुकाराम पालखी सोहळ्याचे प्रमुख तुकाराम महाराजांचे वंशज माणिक महाराज मोरे यांनी दिली असून यासाठी मोठे सहकार्य केले आहे. १३ जून रोजी ते श्रीगोंदा पालखी सोहळ्याच्या नियोजनासाठी येणार असल्याची माहिती दिली. पालखी सोहळ्याच्या प्रवासादरम्यान शेख महंमद यांची, संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या पालखी सोहळ्याची पिराची कुरुळी या ठिकाणी २७ जून रोजी सकाळी सात वाजता भेट होणार असल्याची माहिती देत या अभूतपूर्व सोहळ्याचे साक्षीदार होण्याचे आवाहन करण्यात आले.