सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदान केंद्रनिहाय मतमोजणी बंद व्हावी

सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदान केंद्रनिहाय मतमोजणी जाहीर केली जात असताना गुप्त मतदान पद्धतीचा उद्देश सफल होत नसून, प्रत्येक निवडणुकीतील मतमोजणी ही मतदान केंद्रनिहाय न करता त्या मतदार संघातील सर्व मतदान केंद्रात झालेले मतदान एकत्र करुन मोजण्याची मागणी पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी चर्चा करून, भारताच्या निवडणूक आयोगाकडे तक्रार केली जाणार आहे. तर वेळप्रसंगी उच्च न्यायालयात देखील जाणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.
प्रभागनिहाय मतमोजणीद्वारे कोणत्या भागातून कोणत्या उमेदवाराला किती? मतदान झाल्याचे निदर्शनास येते. यामुळे गुप्त मतदान पद्धतीला हरताळ फासला जात आहे. लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रत्येक निवडणुकीतील मतमोजणी ही मतदान केंद्रनिहाय न करता, त्या मतदार संघातील सर्व मतदान केंद्रात झालेले मतदान एकत्र करून घेण्याचा आग्रह संघटनेच्या वतीने धरण्यात आला आहे.
संघटनेच्या वतीने भाडभ्रष्ट उमेदवारांना घरचा रस्ता दाखविण्यासाठी डिच्चू कावा मोहिम हाती घेण्यात आली आहे. निष्क्रीय व भ्रष्ट उमेदवारांना धडा शिकवण्यासाठी नागरिकांची तयारी आहे.  मात्र उमेदवारांना माहित पडेल या भितीने त्या विरोधात मतदान करण्यास नागरिक घाबरतात. मतदान केंद्रनिहाय मतमोजणी होत असल्याने कोणत्या भागातून किती मतदान झाल्याचे कळते? यामुळे नागरिकांनी केलेल्या गुप्त मतदानाला अर्थ राहत नाही. निवडणुकित पैसे खर्च करणारे धनदांडगे उमेदवार आपल्या विरोधात मतदान झाल्याचे लगेच ओळखू शकतात. त्यामुळे निवडणूक मतमोजणीमध्ये क्रांतिकारक उपाय करण्याची गरज भासत असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रत्येक मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवरील मतांच्या ईव्हीएम मशीनला कोड अथवा नंबर टाकून मतमोजणी केली जाऊ शकते. मतदान केंद्रनिहाय मतदान मोजणी न करता सरसकट कोड अथवा नंबरप्रमाणे मोजणी झाल्यास कोणत्या भागातून किती मते पडली हे उमेदवाराला समजू शकणार नाही. यामुळे नागरिकांना न घाबरता डिच्चू कावा तंत्राचा अवलंब करुन भाडभ्रष्ट उमेदवारांना धडा शिकवता येणार असल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी म्हंटले आहे. जय शिवाजी, जय डिच्चू कावा मोहिमेला नागरिकांमधून चांगला प्रतिसाद मिळत असून, ही मोहिम यशस्वी करण्यासाठी अ‍ॅड. गवळी, अशोक सब्बन, कॉ. बाबा आरगडे, जालिंदर बोरुडे, पै. नाना डोंगरे, विजय भालसिंग, वीरबहादूर प्रजापती, प्रकाश थोरात, सुधीर भद्रे, शाहीर कान्हू सुंबे, बाळासाहेब गायकवाड, विठ्ठल सुरम, अशोक भोसले आदी प्रयत्नशील आहेत.