स्थायी समितीच्या सभापतीपदी कुमारसिंह वाकळे बिनविरोध

अहमदनगर : महापालिका स्थायी समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीचे कुमारसिंह वाकळे यांची बिनविरोध निवड झाली आहे . या पदासाठी वाकळे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड निश्चित होती.

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली या निवडीसाठी शुक्रवारी सभा झाली. नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांचा एकमेव अर्ज दाखल असल्यामुळे जिल्हाधिकारी भोसले यांनी त्यांची बिनविरोध निवडीची घोषणा केली. यावेळी निवडणूक निर्णय उपजिल्हाधिकारी श्री. पाटील व स्थायी समितीचे सदस्य ऑनलाइन सभेत उपस्थित होते. सुरूवातीला अर्जाची छाननी करण्यात आली. त्यानंतर माघारसाठी वेळ देण्यात आला. ही प्रक्रिया झाल्यानंतर पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी भोसले यांनी वाकळे यांची स्थायी समितीच्या सभापतिपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.

निवडीनंतर सभापती वाकळे म्हणाले, आमदार संग्राम जगताप यांनी माझ्यावर विश्वास टाकून स्थायी समिती सभापतिपदावर काम करण्याची संधी दिली. या पदाच्या माध्यमातून शहर विकासाला गती देण्यात येईल. महाविकास आघाडीच्या वतीने काम करण्याची संधी मला मिळाली आहे. महापालिकेच्या आवारात लवकरच सर्वांना बरोबर घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येईल. तसेच सर्व नगरसेवक पदाधिकार्‍यांना बरोबर घेऊन नगर शहराच्या विकासासाठी काम करणार आहे.

यावेळी महापौर रोहिणीताई शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते, मनपा विरोधी पक्षनेता संपत बारस्कर, नगरसेवक अविनाश घुले, नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे, माजी विरोधी पक्ष नेता संजय शेंडगे, नगरसेवक गणेश कवडे, नगरसेवक प्रशांत गायकवाड, नगरसेवक श्याम नळकांडे, नगरसेवक सचिन शिंदे, नगरसेवक समद खान, नगरसेविका ज्योती गाडे, नगरसेविका वंदनाताई ताठे, विलास ताठे, नगरसेविका मीनाताई चव्हाण, नगरसेविका रिता भाकरे, कुरेशी, अंजली आव्हाड, राजेंद्र तागड, साधना बोरुडे आदी उपस्थित होते.