अहिल्यानगर : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. मतदारांना आपले मतदानाचे केंद्र, यादीतील क्रमांक, आदींची माहिती असलेली मतदार चिठ्ठी जिल्हा निवडणूक शाखेकडून घरोघरी वाटप केली जात असून १५ नोव्हेंबरपर्यंत २५ लाख मतदारांना या चिठ्ठीचे वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघांतील ३ हजार ७६३ मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यात ३७ लाख ८३ हजार ९८७ मतदारांची नोंद झालेली आहे. या मतदारांना शुक्रवारपर्यंत ६६.९७ टक्के मतदार चिठ्ठीचे वाटप करण्यात आले आहे.
मतदानाचे केंद्र, मतदार यादीतील क्रमांक, आदी माहिती सुलभरीत्या उपलब्ध होण्यासाठी मतदार चिठ्ठया दिल्या जातात. मतदारांपर्यंत ह्या चिठ्ठया त्या-त्या भागात नियुक्त मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यामार्फत वितरित करण्यात येत आहे. मतदारांच्या घरोघरी जाऊन पथकामार्फत मतदार चिठ्ठया पोहोचविण्यात काम केले जात आहे. मतदान करण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळख जवळ नसल्यास अन्य १२ पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले असून, त्यांपैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर संबंधितांना मतदान करता येणार आहे.
◆ मतदारसंघातील वाटप पूर्ण
अकोले ६६.६३
संगमनेर ६०.४०
शिर्डी ६१.६४
कोपरगाव ८१.८५
श्रीरामपूर ६५.४२
नेवासा ५१.८३
शेवगाव ६९.३४
राहुरी ६५.८७
पारनेर ७३.७१
नगर शहर ६६.३९
श्रीगोंदा ५८.०२
कर्जत ७९.४३