अहमदनगर :
भाऊबीजेनिमित्त ज्यांना परीवार किंवा भाऊ नाही, अश्या वंचित महिलांना स्नेहभावाचे प्रतीक म्हणून माहेरची साडी देण्याचा उपक्रम सामाजिक कार्यकर्ते धर्मराज शंकर औटी गुरुजी यांनी दीड दशकांपूर्वी चालु केला. वयोमानामुळे औटी गुरुजींना आलेल्या मर्यादा विचारात घेऊन यंदाच्या वर्षी स्नेहालय परिवाराने या उपक्रमाची जबाबदारी स्वीकारली आहे. जाणीवसंपन्न नागरिकांच्या सहयोगातून यंदाही भाऊबीजेला वंचित भगिनींना हक्काची साडी त्यामुळे मिळणार आहे.
अशा मानस भगिनींसाठी किमान एक साडी प्रायोजित करण्याचे आवाहन स्नेहालय परिवारातर्फे प्रवीण मुत्याल ,दीपक बूरम , अजित कुलकर्णी, मीना पाठक, यशवंत कुरापट्टी, शारदा गौडा, जया जोगदंड ,संगीता शेलार आदींनी केले आहे. मागील १५ वर्षांपासून धर्मराज शंकर औटी गुरुजी या निवृत्त शिक्षकांने हा उपक्रम निष्ठेने राबवला. निवृत्ती वेतनातून ते स्वतः २० हजारांची मदत द्यायचे. नंतर समाजातील दानशूर भावाकडून आर्थिक सहयोग मिळवून प्रत्येक बहिणीला माहेरची साडी ते द्यायचे. यात साडीला आणि तिच्या किंमतीला फारसे महत्त्व कधीच नव्हते. परंतु अनामिक भावांनी स्नेहालय परिवारामार्फत आपल्या बहिणींना दिलेल्या या साडीला भावनिक मूल्य मात्र प्रचंड असते.
जगदंबा हे कपड्यांचे दुकान अहमदनगर मधील पाईपलाईन रस्त्यावर आहे. त्याचे संचालक शिवाजी चव्हाण या उपक्रमासाठी ना नफा ना तोटा तत्त्वावर साड्या देतात. काही साड्या त्यांच्यातर्फे सप्रेम भेट म्हणून देतात. पुणे येथील स्नेहालय चे विश्वस्त पालक किरीटी श्यामकांत मोरे आणि महानुभाव पंथातील कार्यकर्ते राजेंद्र कपाटे यांनी या उपक्रमात खंड पडू नये म्हणून उस्फुर्त पुढाकार घेतला. नवीन १२० साड्यांसाठी त्यांनी आर्थिक सहयोग दिला. एकूण ३५० महिलांना माहेरची साडी देण्याचे उद्दिष्ट आहे. साधारणत: ३०० रुपयांची नवी साडी या उपक्रमातून दिली जाते.
या उपक्रमाला संवेदनशील नागरिकांनी सहयोग द्यावा,असे आवाहन स्नेहालय परिवाराने केले आहे. अधिक माहितीसाठी संयोजक ९०११०२६४८५ किंवा ९०११११३४८० यांच्याशी संपर्काचे आवाहन स्नेहालय परिवाराने केले आहे.