डॉ. प्रेमानंद गज्वी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

डॉ. समीर चव्हाण, प्रफुल्ल शिलेदार, श्रीनिवास हेमाडे, प्राजक्त देशमुख, हसन शेख पाटेवाडीकर, प्राध्यापक लबडे यांना विखे पाटील पुरस्कार जाहीर

लोणी – यावर्षीचा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साहित्य जीवन गौरव पुरस्कार जेष्ठ साहित्यिक डॉ. प्रेमानंद गज्वी यांना जाहीर झाला आहे. तर राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार डॉ. समीर चव्हाण यांना, राज्यस्तरीय विशेष साहित्य पुरस्कारा प्रफुल्ल शिलेदार यांना, अहमदनगर जिल्हा साहित्य पुरस्कार डॉ. श्रीनिवास हेमाडे यांना, राज्यस्तरीय नाट्य सेवा पुरस्कार प्राजक्त देशमुख यांना, राज्यस्तरीय कला गौरव पुरस्कार तमाशा कलावंत हसन शेख पाटेवाडीकर यांना तर प्राध्यापक लबडे यांना अहमदनगर जिल्हा विशेष साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. अशी माहिती पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांनी दिली आहे. यंदा पुरस्काराचे ३४ वे वर्ष असुन डॉ. विखे पाटील यांच्या १२४ व्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रवींद्र शोभणे यांच्या हस्ते १९ ऑगस्ट रोजी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत हा वितरण सोहळा पार पडणार आहे. समितीमध्ये कसबे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ.एकनाथ पगार, डॉ. दिलीप धोंडगे, डॉ.राजेंद्र सालकर यांचा समावेश होता.