खेडकर मॅडम लागल्या कामाला; आयोगाविरुद्ध याचिका दाखल

दिल्ली उच्च न्यायालयात होणार पूजा खेडकरची सुनावणी

भारतीय प्रशासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आलेल्या पूजा खेडकर यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या उमेदवारी रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली आहे. खेडकर हिला कारणे दाखवा नोटिसा बजावणाऱ्या कार्मिक आणि लोकतक्रार विभाग, लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी, महाराष्ट्राचे मुख्य सचिव, पुण्याचे जिल्हाधिकारी यांनाही याचिकेत प्रतिवादी करण्यात आले आहे. चुकीच्या पद्धतीने स्वतःची ओळख सादर करुन परीक्षा नियमांनी निर्धारित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्तवेळा परीक्षेला बसल्याच्या आरोपावरुन केंद्रीय लोकसेवा आयोगाने पूजा खेडकर हिला २०२२ च्या नागरी सेवा परीक्षेच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरविले आहे. तसेच तिची उमेदवारीही रद्द केली आहे. आयोगाने भविष्यात पूजा खेडकर हिला परीक्षा देण्यास तसेच तिची निवड होण्यावरही बंदी घातली आहे. खेडकरविरुद्ध केंद्रीय लोकसेवा आयोगाने दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी अटक टाळण्यासाठी खेडकरने केलेली अंतरिम जामिनाची याचिका दिल्लीच्या पतियाळा हाऊस न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश देवेंद्र कुमार जांगला यांनी आधीच फेटाळली होती.