१० हजार १५५ उमेदवार एमपीएससी परीक्षेसाठी

नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४; जिल्ह्यातील २८ उपकेंद्रावर २५ ऑगस्टला पूर्व परीक्षा

अहमदनगर : महाराष्ट्र लोकसेवा राज्य आयोगाच्या (एमपीएससी) वतीने नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ही रविवार (ता. २५) जिल्ह्यातील २८ उपकेंद्रावर घेण्यात येणार आहे. सकाळी १० ते दुपारी १२ व दुपारी ३ ते सायंकाळी ५ वाजता या दोन सत्रात ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेला १० हजार १५५ उमेदवार बसलेले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा परीक्षा केंद्रप्रमुख राजेंद्रकुमार पाटील यांनी दिली. परीक्षासाठी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रत्येक उपकेंद्रावर पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. परीक्षा उपकेंद्रांच्या १०० मीटर परिसरातील एस.टी.डी.बूथ, फॅक्स, झेरॉक्स, दुकाने बंद ठेवण्यात येणार आहे. परीक्षेच्या दिवशी सकाळी ७ वाजेपासून सायंकाळी ६ वाजेपर्यत परीक्षा क्षेत्रामध्ये सीआरपीसी १९७३ चे कलम १४४ (३) लागू करण्यात आले आहे. परीक्षेची प्रवेश प्रमाणपत्रे उमेदवारांनी स्वतःच आयोगाच्या वेबसाईटवरून डाऊनलोड करून घ्यावयाची आहेत. दुय्यम प्रवेश प्रमाणपत्रे जिल्हाधिकारी कार्यालयामधून देण्यात येणार नाहीत.
परीक्षेस बसलेल्या उमेदवारांना सकाळी साडेआठ वाजता परीक्षा कक्षात प्रवेश देण्यात येणार आहे. उत्तरे लिहिण्यासाठी फक्त काळ्या शाईचे बॉल पॉईंटपेन वापरण्यास परवानगी आहे, मोबाईल, कॅल्क्युलेटर, डिजिटल डायरी, पेजर, मायक्रोफोन सारखी दूरसंचार साधने परीक्षा केंद्राच्या परिसरात आणि परीक्षा दालनात आणण्यास व स्वतःजवळ बाळगण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. या सूचनेचे उल्लंघन करणाऱ्या उमेदवारास या परीक्षेस, तसेच त्यापुढील आयोगाच्या इतर सर्व परीक्षांसाठी कायमस्वरुपी प्रतिबंधित करण्यात येणार आहे .