बिटकॉइनप्रकरणी मेहताच्या घरी छापे
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या काही तास अगोदर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणुकीसाठी बिटकॉईनच्या माध्यमातून पैसे आणल्याचा आरोप झाल्यानंतर या प्रकरणाचा कथित मुख्य सूत्रधार गौरव मेहता याच्या रायपूर येथील निवासस्थानी ईडीने छापेमारी केली. सीबीआयनेही गौरव मेहता याला चौकशीसाठी पाचारण केले आहे. भाजपने मंगळवारी संध्याकाळी सुप्रिया सुळे यांच्या कथित आवाजातील एक क्लिप प्रसारित करत बिटकॉईन घोटाळ्यातील पैशांचा वापर त्यांनी राज्याच्या निवडणुकीत केल्याचा आरोप केला होता. सुळे यांनी या आरोपाचे खंडन करत पुण्यात सायबर पोलिसांत या विरोधात तक्रारही दाखल केली आहे. मात्र, बुधवारी सकाळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणातील कथित मुख्य सूत्रधार गौरव मेहता याच्या निवासस्थानी छापेमारी केली.
◆ मेहतावर काय आरोप?
◆ गौरव मेहता याने २०१७ साली सामान्य लोकांना गुंतवणुकीवर महिन्याकाठी १० टक्क्यांच्या परताव्याचे आमिष दाखवत ६६०० कोटी रुपये जमवल्याचा आरोप आहे.
◆ हे पैसे त्याने बिटकॉईनमध्ये गुंतवल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले होते. गुंतवणूकदारांना परतावा न देता त्यांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्याच्याविरोधात महाराष्ट्र आणि दिल्ली पोलिसांत गुन्हा दाखल आहे