मागे बसलेल्यांना आता हेल्मेटसक्ती!
महाराष्ट्र : विनाहेल्मेट दुचाकीस्वार व सहप्रवाशावर कारवाई करण्याचा आदेश वाहतूक विभागाच्या अपर पोलिस महासंचालकांनी राज्यातील सर्व पोलिस आयुक्त व अधीक्षकांना दिला. विधानसभा निवडणुकीनंतर त्वरित आदेश काढण्यात आला. त्यामुळे दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती करण्याविषयी रोष व्यक्त केला जात आहे. आतापर्यंत केवळ विनाहेल्मेट असलेल्या दुचाकीचालकांवर कारवाई करण्यात येत होती. आता सहप्रवाशावरही करवाई केली जाणार आहे. त्यासाठी वाहतूक पोलिसांच्या ई-चलन मशिनमध्ये बदल केला आहे. केवळ सहप्रवाशावर कारवाई करण्याची तरतूद केल्याचे महासंचालकांनी काढलेल्या पत्रात नमूद आहे. सध्या विनाहेल्मेट वाहनचालकांवर सीसीटीव्हीद्वारेही कारवाई केली जात आहे. अशा प्रकारे पुण्यात दररोज सुमारे चार हजार चालकांवर कारवाई केली जाते. त्यातून दंड भरणाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे दंडाचे प्रकरण लोकअदालतीमध्ये ठेवण्यात येणार असल्याचे वाहनचालकांना कळविले जाते. तेव्हा बहुतेक वाहनचालक दंड भरतात.
पत्रात काय ?
राज्यातील गेल्या पाच वर्षांतील रस्ते अपघातांचा आढावा घेतला असता असे दिसून आले आहे, की विनाहेल्मेट दुचाकीस्वार व सहप्रवासी यांचे अपघात, मृत्युमुखी तसेच जखमींच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. मोटार वाहन कायद्यातील तरतुदीप्रमाणे विनाहेल्मेट दुचाकीस्वार व सहप्रवासी यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांकडून दंड आकारण्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून आले आहे.