नवीन वर्षात शहरामध्ये धावणार ई-बस; पहिल्या टप्प्यात १० बसेस मिळणार!

अहिल्यानगर : केंद्र सरकारच्या शहरी विकास मंत्रालयामार्फत अहिल्यानगर शहरासाठी ४० ई-बसेस उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी महापालिकेकडून केडगाव येथे चार्जिंग स्टेशन उभारणीचे काम सुरू आहे. पहिल्या टप्यात दहा बसेस उपलब्ध होणार असून, मार्च महिन्यात ही सेवा सुरू होईल, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली. या योजनेत नगर शहराला गरजेनुसार ३५ सीटच्या ४० बसेस उपलब्ध होणार आहेत. केंद्र शासनाने बस उपलब्ध करून देण्यासाठी नवीदिल्ली येथील कंपनीला काम दिले आहे.

मार्च महिन्यात पहिल्या टप्यातील दहा बसेस उपलब्ध होणार आहेत. चार्जिंग स्टेशनसाठी महापालिकेने केडगाव येथील अडीच एकर जागा निश्चित केली आहे. तेथे वीज भार मंजूर झालेला आहे. सोनेवाडी सब स्टेशन पासून महापालिकेच्या सबस्टेशन पर्यंत विजेचा पुरवठा करणारी उच्चदाब वाहिनी टाकण्याचे काम महावितरणमार्फत सुरू आहे. या कामाचा खर्च केंद्र सरकार करणार असून हा १.९७ कोटी रुपयांचा निधी थेट महावितरणकडे वर्ग झाला आहे. तसेच, चार्जिंग स्टेशन उभारणीसाठी ९.०६ कोटी रुपये मंजूर असून त्याचे कामही सुरू झाले आहे. कामाला गती देण्याच्या सूचना दिल्या असून, लवकरच हे कामही पूर्ण होईल, असे आयुक्त डांगे यांनी सांगितले.