“येत्या गुरुवारी माझं अजून एक गाणं येत आहे त्यावरही ट्रोलिंग करा. सर्वांच स्वागत आहे,” असं म्हणत विरोधीपक्ष नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये आपल्या नवीन गाण्याची घोषणा केली. मात्र अमृता यांनी केलेली घोषणा आणि त्यामधील ट्रोलिंगचं आमंत्रण नेटकऱ्यांनी फारच गांभीर्याने घेतल्याचे दिसतय. . त्यामुळेच अमृता यांच्या गाण्यासंदर्भातील बातमी समोर आल्यानंतर हे गाणं येण्याआधीच नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. येत्या गुरुवारी अमृता यांचं गाणं येणार असून ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी हे गाणं प्रकाशित केलं जाऊ नये, अशी मागणी करणारी ऑनलाइन याचिकाच “चेंज डॉट ओआरजी” या वेबसाईटवर तयार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे काही तासांमध्ये ४०० हून अधिक जणांनी या ऑनलाइन याचिकेचं समर्थन केलं आहे.
अमृता यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये येत्या गुरुवारी मी गायलेलं एक गाणं प्रदर्शित होत असून हे गाणं एका सस्पेन्स चित्रपटातील आहे असं सांगितलं. तसेच हे येणारं नवीन गाणं हे प्रमोशनल साँग असून प्रत्यक्षात चित्रपटातही त्याचा वापर करण्यात आला आहे. हे गाणं एन्जॉय करा, ट्रोल करा पण नक्की पाहा असं आवाहनही अमृता यांनी केलं. मात्र हे गाणं प्रदर्शित होण्याआधीच अमृता यांना ट्रोलर्सने पुन्हा लक्ष्य केलं आहे. चेंज डॉट ओआरजी या वेबसाईटवर एका युझरने सोमवारी ‘पर्यावरणाचे सौरक्षण करण्यासाठी आणि ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी अमृता फडणवीस यांनी गाऊ नये,’ अशी ऑनलाइन याचिका दाखल केली आहे. या ऑनलाइन याचिकेच्या डिस्क्रिप्शन अमृता यांचा उल्लेख मामी असाही करण्यात आलाय. “पुढच्या गुरुवारी मामींचे नवीन गाणे येणार आहे. या गाण्याने होणारे ध्वनिप्रदूषण माणसाला घातक ठरू शकते. हे गाणे त्यांनी रिलीज करू नये यासाठी आपण पेटीशन साइन करणे गरजेचे आहे,” असं या याचिकेच्या डिस्क्रिप्शनमध्ये म्हटलं आहे. तसेच पुढे, “आपला कान, आपली जबाबदारी” असंही लिहिण्यात आलं आहे.
सोशल नेटवर्किंगवर प्रचंड अॅक्टीव्ह असणाऱ्या अमृता यांना ट्रोलिंगसंदर्भात मुलाखतीमध्ये प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना अमृता यांनी, “ट्विटर किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मत व्यक्त करतो तेव्हा त्याच्या बाजूने किंवा विरोधात बोलण्याचा हक्क असतो. तसा हक्क मी ही बजावते. अनेकदा मी माझी मत सोशल नेटवर्किंगवरुन मांडत असते. कधी मी ट्रोल होते तर कधी माझं कौतुक होतं. हे पार्ट अॅण्ड पार्सल ऑफ लाइफ आहे,” असं मत व्यक्त केलं.