बहिणीचं ‘दिल से सरहद तक’ प्रेम – १६ हजार राख्या जवानांसाठी!
देशासाठी सीमेवर उभं असलेल्या जवानांना राखीचा प्रेमबंध… तोही तब्बल १६,००० वेळा! होय, श्रीरामपूरच्या कलावती देशमुख या प्रेरणादायी बहिणीने आपल्या हातांनी तयार केलेल्या


अहिल्यानगर | मेट्रो पोर्टल न्यूज
देशासाठी सीमेवर उभं असलेल्या जवानांना राखीचा प्रेमबंध… तोही तब्बल १६,००० वेळा! होय, श्रीरामपूरच्या कलावती देशमुख या प्रेरणादायी बहिणीने आपल्या हातांनी तयार केलेल्या १६ हजार राख्या देशभरातील जवानांना पाठवल्या आहेत. गुरुवारी अहिल्यानगरच्या मुख्य पोस्ट कार्यालयात या उपक्रमाचं औपचारिक आयोजन झालं, आणि एक अनोखा भावनिक क्षण साक्षी झाला.
“राखी म्हणजे केवळ धागा नाही, ती एक भावना आहे”, असं म्हणणाऱ्या कलावती देशमुख या गेली ५ वर्षं हा उपक्रम सातत्याने राबवत आहेत. वर्षभर मनोभावे राख्या तयार करत आणि रक्षाबंधनाच्या आधी त्या भारतीय सैनिकांना पाठवून त्यांच्याशी नातं जोडत आहेत.
यंदाचा ‘राखी मोमेंट’ अधिक खास बनला, कारण ‘दिल से सरहद तक’ या पोस्ट विभागाच्या उपक्रमांतर्गत या राख्या पाठवण्यात आल्या. कार्यक्रमाला पोस्टचे प्रवर अधीक्षक विकास पालवे, भिंगार छावणीचे CEO विक्रांत मोरे, पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे, प्रधान पोस्टमास्तर हेमंत खडकीकर, मेजर सुनील देवकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
पालवे यांनी सांगितलं, “पोस्ट विभाग हा केवळ सेवा नाही, तो भावना जपतो. कलावतीताईंनी जवानांसाठी जे केलंय, ते खरं देशभक्तीचं उदाहरण आहे.” तर मोरे यांनी आपलं बालपण आठवत सांगितलं की, “पोस्टाच्या माध्यमातून आलेल्या पत्रांनी आयुष्यात प्रेरणा दिली, आणि आज कलावती देशमुख यांच्या राख्यांनी तोच जुना गोडवा पुन्हा अनुभवायला मिळाला.”
कलावतीताईंनी सांगितलं की, “राख्या पाठवणं ही माझ्यासाठी सेवा, सन्मान आणि कृतज्ञतेचा भाव आहे. माझ्या हातून हे होतंय, हीच माझी खरी आनंदाची गोष्ट आहे.”
कार्यक्रमात शुभम केनेकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला, तर भूषण शिंदे, हर्षल शिंदे, दीप देशमुख यांचे सहकार्य विशेष कौतुकास पात्र ठरले.