समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय व यशस्वी काम करणा-या लोकांमध्ये नेतृत्वाबरोबरच विनम्रता हा गुण अंगीकारला पाहिजे. असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.
लेक्सिकॉन ग्रुप, पुणे टाईम्स मिररच्या “भारत लिडरशिप अवार्ड 2021 ” चे वितरण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते लेक्सिकॉन कॅम्पस वाघोली, पुणे येथे झाले. त्यावेळी श्री. कोश्यारी बोलत होते. यावेळी लेक्सिकॉन ग्रुपचे चेअरमन सुखदेव शर्मा, पुणे टाईम्स मिररचे अध्यक्ष पंकज शर्मा, पुणे टाईम्स मिररचे उपाध्यक्ष नीरज शर्मा, प्रा. अनिरुध्द देशपांडे, अवार्ड विजेते व त्यांचे कुटूंबीय उपस्थित होते.
श्री. कोश्यारी म्हणाले, माणसाच्या स्वभावातील अहंकार हा त्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. माणूस जेवढा विनम्र राहील तेवढा यशस्वी होईल. काम करणा-यांपैकी जो आपल्या कामाचा मागोवा घेतो तोच यशस्वी नेता होऊ शकतो. आज समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनिय काम करणा-या व्यक्तींना माझ्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्यांनी सर्वांनी विनम्रता हा गुण अंगीकारला पाहिजे. विनम्रता हीच तुम्हाला सर्वोच्च उंचीवर घेऊन जाईल.
सध्या कोरोनाची साथ चालू आहे. लोकांनी आपणहून नियम पाळलेच पाहिजेत अन्यथा नियम न पाळल्यास तिसरी लाट आपणच आणू असे सांगून श्री. कोश्यारी म्हणाले, पुणे टाईम्स मिररने समाजातील चांगल्यातल्या चांगल्या गोष्टी समाजापूढे आणल्या पाहिजेत. समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणा-यांचा भारत लिडरशीप अवार्ड देऊन सन्मान केला त्याबद्दल लेक्सिकॉन ग्रुपचे व अवार्ड विजेत्यांचे अभिनंदन.
लेक्सिकॉन ग्रुप, पुणे टाईम्स मिरर तर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या पंचवीस मान्यवरांना भारत लिडरशीप अवार्ड 2021 देऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.