पुणे (वैष्णवी घोडके)
कार मधून 12 लाख रुपये रोख रक्कम घेऊन जात असलेल्या एका कार चालकाला तीन अनोळखी व्यक्तींनी अडवले. कार चालकाला बोलण्यात गुंतवून एका व्यक्तीने त्यांच्या कारमधून 12 लाख रुपयांची रोकड चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. 8) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास तळेगाव चौक, चाकण येथे घडली. या प्रकरणातील चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
समीर ज्ञानेश्वर सोनवणे (वय 21), अक्षय पुंजा सोनवणे (27), प्रदीप सुनील नवाळे (वय 22), सुरेश दादू गायकवाड (वय 32, सर्व रा. संगमनेर अहमदनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. राजू रावसाहेब बो-हाडे (वय 37, रा. करुले, ता. संगमनेर, अहमदनगर) यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार,संगमनेर येथील के के थोरात या कंपनीचे लेखापाल फिर्यादी बो-हाडे आणि कार चालक सुरेश गायकवाड त्यांच्या कार मधून (एम एच 17 / बी एक्स 7576) बारा लाख रुपये रोख रक्कम कंपनीतील कामगारांचे पगार करण्यासाठी घेऊन जात होते.
तळेगाव चौक चाकण येथे अनोळखी 3 इसमांनी फिर्यादी यांची गाडी आडवली. त्यानंतर कट का मारला असे म्हणून फिर्यादी यांना बोलण्यात गुंतवले.फिर्यादी यांना बोलण्यात गुंतवून एका इसमाने फिर्यादी यांच्या गाडीच्या उघड्या दरवाजातून पाठीमागे ठेवलेली बारा लाख रुपये रोकड असलेली बॅग चोरून नेली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करत आरोपींना अटक करण्यात आली .