रयतच्या विभागीय कार्यालयावर ग्रामपंचायत सदस्या संगिता मांजरे यांचे उपोषण
व्यक्तीगत माहिती मिळवून महिलांना वेठीस धरत असल्याचा आरोप
अहमदनगर(संस्कृती रासने):
रयतच्या भास्करराव गलांडे पाटील स्कुल कमिटीचे अध्यक्ष पदाचा गैरवापर करून बेकायदेशीर कामे करण्यास शाळेच्या मुख्याध्यापकांना भाग पाडत असल्या प्रकरणी त्यांची तात्काळ पदावरुन हकालपट्टी करावी या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्या संगीता मांजरे व ग्रामस्थांनी रयत शिक्षण संस्थेच्या अहमदनगर येथील उत्तर विभागीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारात आमरण उपोषण केले. या उपोषणात नानासाहेब मांजरे, भागचंद नवगीरे, नितीन जाधव, अकिल पठाण, आनंद जाधव, प्रभाकर जाधव, संभाजी जाधव, सुनिल जाधव, रविंद्र जाधव, बाळासाहेब गिरे, सचिन आढाव आदी सहभागी झाले होते.
अशोकनगर (ता. श्रीरामपूर) येथील भास्करराव गलांडे पाटील माध्यमिक विद्यालय येथील शाळेमध्ये स्कूल कमिटीचे अध्यक्ष म्हणून सोपान राऊत यांची निवड करण्यात आली. त्यांनी पदाचा गैरवापर करुन शाळेमधील शिक्षकांचा राजकीय हेतुपुरस्पर वापर करणे, राजकीय सत्तेचा वापर करून मुख्याध्यापकांना चुकीचे कामे करण्यास भाग पाडणे, मर्जीतील कार्यकर्त्यांची शाळेमध्ये ऊठबस करणे असे प्रकार करत आहे. यासंदर्भात शाळेचे मुख्याध्यापक यांना वारंवार सूचना केल्या, परंतु त्यांच्यावर दबाव असल्याने त्यांनी सदरचा प्रकार संस्थेकडे कळवलेला नाही.
रयतेची शाळा ज्ञानमंदिर असताना त्याठिकाणी राऊत संस्थेच्या स्कूल कमिटीच्या अध्यक्ष पदाचा दुरुपयोग करुन संस्थेच्या घटनात्मक तरतुदीची पायमल्ली करीत आहे. तर विद्यालयाचा वापर राजकारणासाठी व महिलांना वेठीस धरण्यासाठी केला जात आहे. कर्मवीरांच्या ज्ञान मंदिराचा वापर राजकीय डावपेचातुन लोकांना वेठीस धरण्यासाठी होऊ लागला असल्याचा असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे.
स्कूल कमिटीचे नूतन अध्यक्ष शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी त्यांचे आई वडील यांची शाळेचे रेकॉर्डवरील खाजगी माहिती मुख्याध्यापकांना खोटे बोलून माता-भगिनींचे व्यक्तिगत स्वातंत्र्य अबाधित ठेवणारी खाजगी माहिती शाळेच्या रेकॉर्डवरुन मिळवत आहे. या माहितीत काही त्रुटी आढळल्यास त्याचा उपयोग राजकीय हेतू साध्य करण्यासाठी आणि व्यक्तीला व महिलेला वेठीस धरुन कार्यकर्त्यांमार्फत मानसिक त्रास देण्याचा प्रकार केला जात आहे. या प्रकारचे वस्तुस्थितीदर्शक पुरावे उपलब्ध असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. सदर स्कूल कमिटीचे अध्यक्ष पदाचा उपयोग फक्त लोकांना महिलांना वेठीस धरण्यासाठी करत आहे. त्यामुळे शाळेतील शिक्षक शिक्षिका पालक यांची मोठी कुचंबना होत असल्याने स्कूल कमिटीचे अध्यक्ष म्हणून निवड केलेले सोपान राऊत हे पदाचा गैरउपयोग करीत असल्याने त्यांना पदावरून काढून टाकण्याची मागणी करण्यात आली आहे.