महापौरांचा कारवाईचा इशारा

काही दिवसांपासुन अहमदनगर शहर व उपनगरात अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. तसेच गढुळ पाणी समस्यांबाबत अनेक सदस्यांनी तक्रारी आहेत. या समस्यांचे तातडीने निराकरण करण्याचे आदेश महापौर रोहिणी शेंडगे यांनी दिले आहेत. यात हलगर्जीपणा केल्यास दोषी कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
महापालिकेची पाणीपुरवठा विभागाची बैठक महापौर शेंडगे यांनी घेतली. यावेळी आयुक्त शंकर गोरे, स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले उपस्थित होते. शहरामध्ये बर्‍याच भागात कमी प्रमाणात व काही ठिकाणी पाणीपुरवठा होत नाही. त्यासाठी विळद पंपिंग स्टेशन ते वसंत टेकडीपर्यंत टाकण्यात आलेली पाईपलाईनवर किती ठिकाणी अनधिकृत कनेक्शन आहेत, याची तपासणी करुन संबंधितांवर कारवाई करावी.
वसंत टेकडी येथील जुनी पाण्याची टाकी काही ठिकाणी गळत असल्यामुळे पाणीसाठा पुरेशा प्रमाणात होत नाही, असे पाणीपुरवठा विभागप्रमुख यांनी सांगितले. पाणीपुरवठा विभागासाठी नेमणुक केलेले मानधनावरील अभियंते व कर्मचारी यांनी दररोज कामकाजाची नोंदवही ठेवली गेली पाहिजे. ती नोंदवही अचानक कधीही तपासली जाईल व जबाबदार असणार्‍यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापौर शेंडगे यांनी यावेळी दिला.