जिल्ह्यात 19 जून पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

अहमदनगर जिल्ह्यात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी 19 जून पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. जिल्ह्यात तसेच ग्रामीण भागात सभा महासभा आंदोलने व जातीय संवेदनशील वातावरण इत्यादीमुळे सार्वजनिक शांतता राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी यांनी 19 जून 2023 रोजी च्या रात्रीच्या 12 वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू राहतील. या आदेशानुसार नमूद कालावधीत कोणत्याही इसमास पुढील प्रमाणे कृत्य करण्यास मनाई करण्यात आली आहे. शस्त्रे, तलवारी, भाले, दंडुके, बंदूका सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू जवळ बाळगणे, कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटके पदार्थ जवळ बाळगणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने जवळ बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे, व्यक्तीचे अथवा मृतदेहांचे किंवा त्यांच्या आकृत्या किंवा प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे ज्यामुळे सभ्यता अगर नीतिमत्ता यास धक्का पोहोचेल अशी व सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्यामध्ये मानहानी करण्याची प्रवृत्ती दिसून येईल अशी कृती करणे किंवा भाषणे करणे, हावभाव करणे किंवा सोंग आणणे अगर तशीचित्रे चिन्हे किंवा इतर वस्तू तयार करणे किंवा त्यांचा प्रचार करणे, सार्वजनिक तसेच खाजगी ठिकाणी निवडणूक प्रचारार्थ तसेच अन्य कारणास्तव सभा घेण्यास मिरवणुका काढण्यास व पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास मनाई केली आहे. शासकीय सेवेतील व्यक्तींना ज्यांना आपले वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्य पूर्तीसाठी हत्यारजवळ बाळगणे आवश्यक आहे,तसेच प्रेतयात्रा, धार्मिक कार्यक्रम, धार्मिक मिरवणुका, लग्न समारंभ, लग्नाच्या मिरवणुका काढणे असे ज्यांनी संबंधित प्रभारी पोलीस निरीक्षक तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक यांची रीतसर परवानगी घेतली आहे अशा व्यक्तींना हा आदेश लागू राहणार नसल्याचे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.