वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांची दखल घेत वाडिया पार्क जलतरण तलावाचे पाणी अखेर झाले स्वच्छ
क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले यांच्या आदेशाने ठेकेदाराने तात्काळ बदलले पाणी
अहमदनगर (प्रतिनिधी): वाडिया पार्क जलतरण तलावातील पाणी अखेर स्वच्छ झाले आहे. वाडिया पार्क जलतरण तलावाला आले गटारीचे स्वरूप अशा मथळ्याखाली वृत्तपत्रात छापून आलेल्या बातम्यांची तात्काळ दखल जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले यांनी घेतली. आणि क्रीडा संकुल मधील जलतरण तलावाची पाहणी केली. आणि तलावाचे ठेकेदार ए के ग्रुप च्या अधिकाऱ्यांना हे पाणी तात्काळ स्वच्छ करण्याचे आदेश दिले . त्यानंतर हे पाणी तात्काळ बदलण्यात आले. यासाठी जलतरण तलाव गेल्या ८ दिवसापासून बंद ठेवण्यात आला होता. जिल्हा क्रीडा अधिकारी मंगळवारी पाणी तपासणी करणार असून त्यानंतर हा तलाव पुन्हा सुरु होणार आहे.
वास्तविक या तलावात कुणीतरी खोडसाळ पणा करून लाल रंग टाकला होता. त्यामुळे या तलावातील पाणी गढूळ झाले होते. अशी माहिती ठेकेदाराच्या वतीने देण्यात आली आहे. हे पाणी स्वच्छ करण्यासाठी क्लोरिनेशन प्लँट सुरु करण्यात आला तेव्हा हा रंग फेसाळ होऊन तो एका बाजूला जमा झाला होता. त्यामुळे हे पाणी गढूळ दिसत होते. पोहणाऱ्यांच्या आरोग्यासाठी हे पाणी धोकादायक होते. त्याबद्दल तक्रारी करण्यात आल्या नंतर हे पाणी बदलण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. त्यासाठी जलतरण तलाव बंद ठेवण्यात आला. आता हे पाणी शुद्धीकरण प्रक्रिया राबवून शुद्ध करण्यात आले आहे. हा तलाव आता लवकरच पोहण्यासाठी खुला होण्याची शक्यता आहे. या जलतरण तलावाची फिल्टरेशन यंत्रणा बंद नव्हती तर अज्ञानातानी रंग टाकल्यामुळे हे पाणी खराब दिसत होते. लाल रंगामुळे हा तलाव लालसर झाला होता. ते पाणी स्वच्छ करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत होती . त्या संदर्भात बातम्या आल्यानतंर जिल्हाधिकारी आणि जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी संबंधित ठेकेदाराला हा तलाव बंद ठेऊन हे पाणी बदलण्याचे आदेश दिले आता हे पाणी स्वच्छ झाले आहे. तलावातील पाणी बदलण्यात आले आहे त्यामुळे हा तलाव पोहण्यासाठी खुला व्हावा अशी अपेक्षा जलतरण शौकिनांना आणि खेळाडूंना आहे.