शहराची वाटचाल मेट्रो सिटीच्या दिशेने; संग्राम जगताप

अहिल्यानगर : शहरातील महत्त्वाचे प्रश्न मार्गी लागत आहेत. उड्डाणपुलाचे काम पूर्ण झालेले आहे. महत्त्वाच्या रस्त्यांचे कॉक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. तरुणांच्या हाताला रोजगार मिळावा, यासाठी एमआयडीसीसाठी जागा निश्चित करण्यात आलेली आहे. त्यामुळे अहिल्यानगर शहराची वाटचाल मेट्रो सिटीच्या दिशेने होत आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी बुधवारी केले. नगर शहरातील सथ्था कॉलनीतील नागरिकांशी आमदार संग्राम जगताप यांनी संवाद साधला. यावेळी जगताप म्हणाले, शहरातील महत्त्वाचे प्रश्न गेल्या दहा वर्षांत मार्गी लागले आहेत. खड्डे मुक्त शहराची संकल्पना राबवून नियोजनबद्ध व कायमस्वरूपी रस्ता कॉक्रीट करण्याची कामे सुरू आहेत. उड्डाणपुलाखालील रस्ता कॉक्रिटीकरणाचे काम मार्गी लागावे, यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. शिल्पा गार्डन ते मार्केट यार्ड चौकापर्यंतचे काम सुरू होणार आहे. शहराच्या प्रगतीसाठी काम करायचे आहे. शहराला चांगली बाजारपेठ लाभली आहे. याचबरोबर विळद घाट येथे ६०० एकर जागा औद्योगीकरणासाठी आरक्षित करण्यात आली आहे. तिथे मोठमोठे प्रकल्प आणण्यासाठी काम सुरू आहे.