अहिल्यानगर महानगरपालिका सुस्वागतम ; महापालिकेकडून नामांतराची अंमलबजावणी !
अहमदनगर : केंद्राच्या मान्यतेनंतर राज्य सरकारने अहमदनगर शहराचे ‘अहिल्यानगर’ असे नामांतर केल्यानंतर रविवारी (दि.६) स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या महापालिकेने या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली आहे. मनपाची जुनी इमारत व प्रभाग कार्यालय तसेच एका आरोग्य केंद्राचे नाव महापालिकेने बदलले आहे. शहराची ओळख असलेल्या मनपाच्या जुन्या कार्यालयावर आता अहिल्यानगर महापालिका अहिल्यानगर सुस्वागतम असे नाव टाकण्यात आले आहे. अहमदनगरच्या नामांतराचे राजपत्र प्रसिद्ध झाल्यानंतर महापालिका आयुक्त यशवंत डांगे महापालिका इमारतींच्या कार्यालयावरील नावे, फलक, दस्तावेज, संकेतस्थळ, यासह आवश्यक त्या दस्तावेजांमध्ये बदल करण्याचे आदेश मनपातील बुरुडगाव रोडवरील आरोग्य केंद्रावरील विभागप्रमुखांसह संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. या आदेशाची रविवारी शहर अभियंता मनोज पारखे, उपअभियंता श्रीकांत निंबाळकर अंमलबजावणी यांनी तत्काळ करत जुनी महापालिका, केडगाव उपकार्यालय, प्रभाग समिती कार्यालये तसेच नाव बदलले आहे. सोमवारी महापालिकेच्या छत्रपती संभाजीनगर, नगर रोडवरील प्रशासकीय इमारत तसेच उर्वरित कार्यालयावरील रस्त्यांवरील पाट्यांची नावे बदलण्यात येणार असल्याचे शहर अभियंता पारखे यांनी सांगितले.
◈महापालिकेच्या पत्रकाची प्रतिक्षा :
अहिल्यानगरचे नाव बदलण्यास महापालिका प्रशासनाने रविवारी सुरवात केली असली तरी इतर आस्थापना, कार्यालये, नागरिकांना अद्याप तरी महापालिकेने नाव बदलण्याबाबत आवाहन केले नाही. रविवारी सुटी आल्याने याबाबतचा आदेश किंवा प्रसिद्धीपत्रक काढले नसावे. मात्र नाव बदलण्याबाबत नागरिकांना आवाहन करणारे प्रसिद्धी पत्रक महापालिका प्रशासनाकडून सोमवारी (दि.७) प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.
◈इतर कार्यालयांनाही पत्र :
महापालिकेचा लोगो, लेटर हेड, संकेतस्थळ येथील नावांतही बदल होणार आहे तसेच शहरातील रेल्वे स्टेशन, बसस्थानक यासह विविध विभागांना नाव बदलण्याबाबत पत्र देण्याच्या सूचना आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्याऱ्यांना दिल्या आहेत. काही दिवसांपूर्वी मनपाने विविध रस्त्यांक फलक लावले होते. तेही बदलले जाणार आहे.