लवकरच अहमदनगचे ‘अहिल्यानगर’ नामकरण होणार

विधानसभा आचारसंहिता लागण्यापूर्वी काम होईल पूर्ण : प्रा.राम शिंदे

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी ‘अहमदनगर’ जिल्ह्याचे नामकरण ‘अहिल्यानगर’ होणार असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री तथा आमदार प्रा.राम शिंदे यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २२८ व्या पुण्यतिथीनिमित्त चौंडी येथे आयोजित अभिवादन सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री अण्णासाहेब डांगे होते. आ.प्रा.शिंदे म्हणाले की,’औरंगाबाद’ आणि ‘उस्मानाबाद’ चे नामकरण करायला ४० वर्षे लागली, पण पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जन्मभूमीत त्यांच्या तीनशेव्या जयंतीला सामोरे जात असताना, आपण मागणी केली, की ही अहिल्यादेवींची जन्मभूमी आहे. त्यामुळे जिल्ह्याचे नामकरण ‘अहिल्यानगर’ करावं आणि अवघ्या ४० मिनिटांत नामकरणाची घोषणाही झाली. दुसऱ्या जयंतीला त्याची कार्यवाही करून मुख्यमंत्री इथे हजर राहिले. प्रस्ताव दिल्लीला गेला. पुण्यतिथीनिमित्ताने मी तुम्हाला सांगतो की निवडणुकीची विधानसभा आचारसंहिता लागण्यापूर्वी अहमदनगर जिल्ह्याचे नाव ‘अहिल्यानगर’ होणार म्हणजे होणार. शिंदे यांच्या या घोषणेनंतर उपस्थित धनगर समाजबांधवांनी एकच जल्लोष केला. यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे, माजी आमदार रामहरी रूपनवर, धनगर महासंघाचे प्रदेशाध्यक्ष ॲड.चिमणभाऊ डांगे, श्रीराम पुंडे, बबनराव रानगे, डॉ.अलका गोडे, सुभाष सोनवणे, सुनील वाघ, संगीता खोत आदी उपस्थित होते.