निवडक विमानांमध्ये ‘एअर इंडिया’ची ही खास सेवा उपलब्ध!

विमान वाहतूक क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी ‘एअर इंडिया’ने आता प्रवाशांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांदरम्यान विमानामध्ये वायफाय इंटरनेट सेवा उपलब्ध करून दिली आहे. ‘एअरबस-ए 350’, ‘बोइंग 787-9’ आणि ‘एअरबस A 321 निओ’ या विमानांमध्ये प्रवाशांना इंटरनेट वायफाय सेवेचा लाभ घेता येईल. देशांतर्गत प्रवासात वायफाय सेवा उपलब्ध करून देणारी एअर इंडिया ही देशातील पहिली विमान वाहतूक कंपनी ठरली आहे. यामुळे प्रवाशांना विमान प्रवासादरम्यानच कार्यालयीन कामे उरकता येतील त्यांना समाज माध्यमांवर सर्फिंग करता येईल, तसेच मित्र आणि कुटुंबीयांशी संदेशांच्या माध्यमातून संवाद साधता येणे शक्य होणार आहे. १ जानेवारी २०२५ पासून ही सेवा अधिकृतरीत्या सुरू होत असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

‘एअर इंडिया’चे मुख्य ग्राहक संवाद अधिकारी राजेश डोगरा यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आधुनिक काळामध्ये कनेक्टिव्हिटी ही प्रवासाचा अविभाज्य घटक बनली असून, रिअल टाइम शेअरिंगचा कम्फर्ट झोन त्यामुळे वाढला आहे. अनेकांच्या उत्पादन क्षमतेत त्यामुळे भर पडली असून, त्यांची गुणवत्ता देखील सुधारली आहे. आमच्या प्रवाशांना याचा नक्कीच लाभ होईल तसेच त्यांना प्रवासाचाही आनंद लुटता येईल. प्रवाशांना त्यांचे लॅपटॉप, टॅब्लेट्स आणि स्मार्टफोनसाठी या वायफायचा वापर करता येईल. विमान हे अवकाशामध्ये दहा हजार फूट उंचीवर असताना गेस्टना वायफायशी स्वतःला कनेक्ट करता येईल असेही कंपनीकडून सांगण्यात आले. विमानातील वायफाय सेवेचा दर्जा हा सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी, बँडविथ, मार्ग आणि सरकारी यंत्रणांचे बंधन यावर अवलंबून असेल.