विद्युत महावितरणने ग्राहकांच्या तक्रारींची दखल घेऊन भविष्यातील अपघात टाळावा अखिल भारतीय मराठा महासंघाची मागणी

अखिल भारतीय मराठा महासंघाची मागणी

 

विद्युत महावितरणने ग्राहकांच्या तक्रारींची दखल घेऊन भविष्यातील अपघात टाळण्यासाठी व होणारी आर्थिक, मानसिक पिळवणुक थांबविण्याची मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन मराठा महासंघाचे युवक जिल्हाध्यक्ष अनिकेत कराळे पाटील महावितरणचे अधीक्षक अभियंता यांना दिले. तर नागरिकांच्या तक्रारी गांभीर्याने घेतल्या जात नसल्याचा निषेध नोंदवून आंदोलनाचा इशारा दिला.
विद्युत महावितरणचे अधिकारी व कर्मचारी नागरिकांच्या तक्रारींकडे लक्ष देत नसल्याने त्या समस्या गंभीर बनत आहे. तर नागरिकांना अवास्तव वीज बिल आकारले जात आहे. यापुर्वी रेल्वे स्टेशन येथे विद्युत प्रवाह केबलच्या वायरमध्ये येऊन एका युवकाला जीव गमवावा लागला आहे.

रुपनर या नागरिकास जानेवारी 2021 चे अचानक वाढीव वीज बिल आल्याने त्यांनी महावितरणच्या भिस्तबाग येथील कार्यालयात तक्रारी केल्या. येथील अभियंत्याने कोणतीही तक्रारीची दखल न घेता ग्राहकास आणखी एक नवीन कनेक्शन घेण्यास भाग पाडले. पहिल्या तक्रारीचे निवारण झाले नसताना दुसरा गंभीर प्रश्‍न महावितरणच्या अधिकार्‍याने निर्माण करुन ठेवला.  एकाच घरात दोन वेगवेगळ्या लाईट पोळवरुन देण्यात याबाबत सदर अभियंत्यास सांगितले असता त्याने हा प्रकार पाहण्याची तसदी देखील घेतली नाही.

नागरिकांनी केलेल्या तक्रारीची दखल महावितरण कडून घेतली जात नाही. भिस्तबाग येथील अभियंत्याने दखल न घेतल्याने त्याची तक्रार करण्यासाठी महावितरण कार्यालयात कार्यकारी अभियंत्याकडे गेले असता त्यांनी देखील उडवाउडवीची उत्तरे दिल्याचा आरोप करण्यात आला.

 

 

महावितरणचे अधिकारी नागरिकांप्रती संवेदनशीलतेने काम करत नसून, त्याच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे. विद्युत महावितरणने ग्राहकांच्या तक्रारींची दखल घेऊन भविष्यातील अपघात टाळण्यासाठी व होणारी आर्थिक, मानसिक पिळवणुक थांबवावी, नागरिकांना चुकीचे मार्गदर्शन करुन त्यांच्या जीवाशी खेळणार्‍या भिस्तबाग येथील अभियंत्यावर कारवाई करण्याची मागणी मराठा महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे.