राज्यस्तरीय बालभजन महोत्सवला ‘मी होणार सुपरस्टार’ मधील छोटे उस्तादांची उपस्थिती!
अहिल्यानगर : बालगायक/वादकामध्ये अध्यात्मिक धार्मिक संस्कार रुजावेत, संगीत साधनेच्या त्यांच्या आवडीला प्रोत्साहन मिळावे या हेतूने यत्या रविवारी दि.12 जानेवारी रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळात टिळकरोड वरील लक्ष्मीनारायण कार्यालयात 15 वे राज्यस्तरीय श्री. सत्यसाई बालभजन महोत्सव संपन्न होत असल्याची माहिती संयोजक अशोक कुरापाटी यांनी दिली. या महोत्सवात राज्यभरातील सुमारे 150 बालगायका वादक सहभागी होत असून त्यांचे फोटोसह माहिती असलेल्या गौरविकेचे यावेळी प्रकाशन होत आहे.
अल्पवयात संगीत साधनेत चमकदार कामगिरी बजावणारे दूरदर्शन वाहिनीवरील मी होणार सुपरस्टार पर्व 3 मधील सर्वोकृष्ट मानकरी यवतमाळची स्वरा मंगेश लाड, बावधन पुणे येथील अन्वित सचिन रणसिंग यांची उपस्थिती असून त्यांच्य सुश्राव्य गायनाने महोत्सवाची सुरुवात व दुपारी 2 ते 4 या वेळात त्यांची नगरच्या रसिकांसाठी मैफिल सादर होणार आहे. त्यांच्याच हस्ते सहभागी बालगायकांना स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, गौरविका देवून सन्मानित केले जाणार आहे. या सांगीतिक मनस्वी आनंदी सोहळ्यात सहभागी होवून उमलत्या पिढीकडून अध्यात्मिक भजनांचा स्वरानंद मिळवावा असे आवाहन कुरापाटी यांनी केले आहे.
यवतमाळची स्वरा लाड (वय 12 वर्ष) हिने वयाच्या 3 र्या वर्षापासून गायनाला व वयाच्या 7 व्या वर्षापासून शास्त्रीय संगीतास सुरुवात केली विविध देश-राज्यस्तरीय संगीत स्पर्धेत तिने सुमारे 130 पारितोषिके मिळविले असून शास्त्रीय संगीताच्या तीन परीक्षा विशेष गुणवतेसह उतीर्ण झाली आहे. दूरदर्शन वाहिनीवरील मी होणार सुपरस्टार पर्व 3 मध्ये तिची पहिल्या बारा मानकरी स्पर्धेत निवड झाली आहे. सुरेल आवाज, गाण्याची फिरत, स्वस्ताल लयीची उपजत समज आहे. शास्त्रीय, सुगम संगीत बळावर संगीत जगतात वेगळा ठसा उमटवित आहे.
बावधन पुणे येथील अन्वित सचिन रणसिंग वय 12 वर्षे याने वयाच्या 5 व्या वर्षापासून गुरु मधुवंती ब्तेरगांवकर यांचेकडे संगीताचे धडे गिरविले. संगीताच्या चार परीक्षा विशेष गुणवतेसह उतीर्ण. पुण्यात प्रतिष्ठित समजल्या जाणार्या जय विजय या गायन स्पर्धेत त्याने प्रथम क्रमांक पटकविला. दूरदर्शन वाहिनीवरील मी होणार सुपरस्टार पर्व 3 मध्ये त्याने आपल्या मधुर आवाजाने नामवंत परीक्षक व राज्यातील संगीत प्रेमींची मने जिंकली आवाजात कमालीची सुरेलता, तानेची स्वच्छ फिरत,विविधता लयकारी, आलापीची मांडणी, वाणाचे गमक गीत मेहनत घेवून या क्षेत्रात झेप घेत आहे. अल्पवयात चमकदार कामगिरी बजाविणारे बालकलावंत यंदाच्या राज्यस्तरीय बालभजन महोत्सवाची शान आहे.