महाराष्ट्र बँक देणार विविध योजनांची माहिती
अहिल्यानगर : अहिल्यानगर येथील बँक ऑफ महाराष्ट्र अंचल कार्यालयाच्या वतीने १० डिसेंबर २०२४ ते १० जानेवारी २०२५ यादरम्यान मार्केटिंग कॅम्पेनची सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये नागरिकांना बँकेच्या ग्राहकोपयोगी विविध योजनांची माहिती डिजिटल व्हॅनच्या भव्य एलईडी डिस्प्लेद्वारे देण्यात येणार आहे, अशी माहिती बँकेचे अंचल प्रबंधक शशांक साहू यांनी दिली. कॅम्पेनच्या सुरुवातीस १० डिसेंबरला मार्केटिंग डिजिटल व्हॅनचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ग्राहकांसाठी या महिनाभराच्या काळात विविध योजना, तसेच कर्ज प्रकरणांमध्ये विविध प्रकारच्या देण्यात येणार असलेल्या सवलती याबद्दल माहिती देण्यात आली. बँकेतर्फे या काळात आकर्षक व्याजदरासह विशेष मुदत ठेव योजना राबविली जात आहे. या योजनेमध्ये ३३३ दिवसांसाठी ७.३५ टक्के व्याजदर, ७७७ दिवसांसाठी ७.२५ व ४०० दिवसांसाठी ७.१० टक्के व्याजदर देण्यात येत आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी ०.५० टक्के जादा व्याजदर देण्यात येत असल्याचे बँकेचे अंचल प्रबंधक शशांक साहू यांनी सांगितले. घर कर्ज व वाहन कर्जासाठी दिल्या जाणाऱ्या कर्ज सेवेमध्ये प्रक्रिया शुल्क शून्य असणार आहे, अशी माहिती बँक व्यवस्थापनाकडून उप अंचल प्रबंधक वर्षा थूल यांनी दिली. बैंक ऑफ महाराष्ट्रच्या जिल्ह्यामध्ये एकूण ५३ शाखा असून, या सर्व शाखांमधून शासनाच्या सर्व सुविधांचा लाभ ग्राहकांना देण्यात येतो. ग्राहकांनी योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, यासाठी हे खास कॅम्पेन राबविण्यात येत असल्याचे बँक व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.