सोनई परिसरात पुन्हा एकदा अवैध धंद्यांचा सुळसुळाट सुरू झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या कार्यकाळात अवैध धंद्यांवर नियंत्रण होते, पण त्यांच्या कार्यकाळानंतर पुन्हा गावठी दारू, जुगार, मटका यांसारखे धंदे मोकळ्या रस्त्यावर सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे.
२३ ऑगस्टला स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने सोनई पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तब्बल सहा ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत ५० हजार ९८० रुपयांचा गावठी दारूचा साठा जप्त करण्यात आला.
हे पहिलेच नाही, याआधीही एलसीबीनेच अनेकदा धाड टाकून अवैध धंदे उघड केले आहेत.
पण प्रश्न असा की – जेव्हा सतत एलसीबीलाच कारवाई करावी लागते, तेव्हा सोनई आणि शनिशिंगणापूर पोलिस काय करत आहेत? गावठी दारू, जुगार, मटका openly सुरू असेल तर पोलीस ठाण्याचा उपयोग काय? गावात कारवाईऐवजी तडजोडी सुरू असल्याच्या चर्चा जनतेत का रंगत आहेत?
नागरिकांचा आरोप आहे की गौण खनिज तस्करी, गुटखा, मावा यांसारख्या धंद्यांवर कधीही सोनई पोलिसांची मोठी कारवाई दिसून आलेली नाही. फक्त दिखाऊ कारवाई करून नंतर सर्व काही मिटवले जाते, असा संशय अधिकच गडद होत आहे.
Metro Portal चा सवाल अवैध धंद्यांवर नेमकी जबाबदारी कोणाची? पोलिस ठाण्याचे अधिकारी डोळेझाक का करत आहेत? नागरिकांनी सुरक्षितता आणि न्यायाची अपेक्षा कोणाकडून ठेवायची?
सध्या परिस्थिती अशी आहे की LCB सतत धाड टाकते आणि पोलिस फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत.
यामुळे सामान्य माणसांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे – “जेव्हा आपल्या भागातच पोलिस कारवाई करत नाहीत, तेव्हा विश्वास ठेवायचा कुणावर?”
सोशल मीडियावर ही बाब तुफान चर्चेत आहे. फेसबुक, व्हॉट्सॲप ग्रुपवर लोक सरळ पोलिसांनाच सवाल विचारत आहेत – “पोलिसांचा जनतेला उपयोग काय?”
कमेंट बॉक्समध्ये नागरिक सरळ लिहित आहेत “धंदे सुरू राहणार, पैसा फिरणार आणि पोलिस शांत बसणार का?”
हा प्रश्न छोटा नाही. कारण हे धंदे केवळ कायदा मोडत नाहीत, तर समाजात गुन्हेगारी आणि व्यसनाधीनता वाढवतात.
सोनई आणि शनिशिंगणापूर पोलिसांनी आता तरी जागं व्हावं आणि खरी कारवाई करावी, अशी मागणी जनतेतून जोर धरतेय.