मतदान प्रक्रियेसाठी महानगरपालिका सज्ज; मतदान केंद्र परिसरात सफाई

अहिल्यानगर : शहरातून अधिकाधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा, शहर विधानसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी महानगरपालिका सातत्याने जनजागृतीपर उपक्रम राबवित आहे. त्या अनुषंगाने आयुक्त यशवंत डांगे यांनी सर्व बीएलओ व सुपरवायझर यांची बैठक घेऊन वोटर स्लीप तयार करून शहरातील सर्व मतदारांपर्यंत पोहोचविण्याचे काम सुरू केले आहे. अहिल्यानगर शहरातील सर्व मतदान केंद्रांत महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत साफसफाई सुरू करण्यात आली आहे. मतदान केंद्रात आवश्यक दुरुस्तीची कामे करण्यात आली आहेत, तसेच दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर, मतदारांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. उद्यान विभागामार्फत मतदान केंद्राच्या परिसरातील वाढलेले गवत काढण्याचे काम सुरू आहे. विद्युत विभागामार्फत आवश्यक दुरुस्ती, विद्युत व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान केंद्रापर्यंत पोहोचताना रस्त्यांच्या कामामुळे मतदारांना अडथळा होऊ नये, यादृष्टीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत. अहिल्यानगर शहरातील मतदारांमध्ये मतदानाबाबत जागृती व्हावी, त्यांना मतदान केंद्र, यादीतील क्रमांक, खोली आदीची अचूक माहिती मिळावी, अधिकाधिक मतदान व्हावे, यासाठी महानगरपालिकेच्या वतीने गृहभेट देऊन मतदार स्लिप वितरण सुरू करण्यात आले आहे. सहायक आयुक्त सपना वसावा, मेहेर लहारे, निखिल फराटे, प्रसिद्धी विभागप्रमुख शशिकांत नजान व कर्मचारी हे शहरात घरोघरी भेटी देऊन मतदार स्लीप पोहोचल्या की नाही, याची खात्री करून स्लीप वाटपाचे नियोजन करत आहेत. शहरातील मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावे, असे आवाहन आयुक्त यशवंत डांगे यांनी केले आहे.