कोचिंग सेंटर की, मृत्यूचे तळघर ?

मार्गदर्शक तत्त्वे तयार करा; सर्वोच्च न्यायालयाने दिली ताकीद

दिल्लीतील जुन्या राजेंद्रनगरमध्ये असलेल्या राऊज आयएएस स्टडी केंद्राच्या तळघरात २७ जुलै रोजी, अचानक तळघरात पाणी साचून तीन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने, सर्वत्र कोचिंग सेंटरच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली असून, कोचिंग सेंटर म्हणजे मृत्यूचे सापळे बनले असल्याची टिपणी केली आहे. संबंधित घटनेच्या अनुषंगाने न्यायालयाने दिल्ली तसेच केंद्र सरकारला नोटीस जारी करत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचे निर्देशही दिले आहेत.

“खासगी कोचिंग सेंटरचे मालक विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत आहेत.अशा वर्गांसाठी सुरक्षेचे नियम लागू करण्यात आले आहेत का?” अशी विचारणा न्यायालयाने केंद्र व दिल्ली सरकारला केली आहे. शिकवणी वर्ग जर सुरक्षेचे नियम पाळत नसतील तर त्यांनी ऑनलाईन पद्धतीने वर्गांचे आयोजन केले पाहिजे, असे न्यायालयाचे मत आहे. पण तूर्तास असा आदेश आम्ही जारी करत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. शिकवणी वर्गांमध्ये पुरेसा उजेड असणे, हवा येणे गरजेचे आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांसाठी हवाप्रकाश खेळती राहील. तसेच सुरक्षा मार्ग उपलब्ध असणे गरजेचे आहे, असे न्या.सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने नमूद केले.