सावधान ! एक डासही घेऊ शकतो तुमचा जीव
डेंग्यू, चिकुनगुनियाचे डास वाढल्याने जिल्ह्यात ७५ डेंग्यूचे रुग्ण दाखल
अहमदनगर : मागील काही दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. रिमझिम पाऊस डासांच्या उत्पत्तीला पोषक ठरतो आहे. जिल्ह्यात साथीच्या आजारांची मोठी साथ नसली, तरी एक डास एखाद्याच्या जीवही घेऊ शकतो. वाढत्या डासांमुळे डेंग्यू, चिकुनगुनिया, झिका व्हायरसचा धोका वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सध्या आरोग्य केंद्र, उपकेंद्रावर ७५ डेंग्यूचे रुग्ण उपचार घेत असून, त्यांची तब्येत चांगली असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. पावसाळ्यात दूषित पाणी, ठीकठिकाणी साचलेल्या घाण पाण्यामुळे अस्वच्छत वाढते, याच कारणांमुळे साथरोग पसरतात. यामध्ये डेंग्यू,चिकुनगुनियाचा समावेश होतो. जिल्ह्यातील विविध गावांमध्ये सध्या ७५ डेंग्यूचे रुग्ण उपचार घेत आहेत. मात्र, नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा डेंग्यू मलेरिया अधिकारी रवींद्र कानडे यांनी केले आहे. जिल्हा रुग्णालयात सध्या डेंग्यूचा एकही रुग्ण उपचार घेत नसल्याचे तेथील साथरोग नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. सध्या हिवताप विभागाकडून जिल्ह्यात उपाययोजना सुरू आहेत.
• डेंग्यूची लक्षणे कोणती ?
डेंग्यू ताप आजाराने रुग्णाला २ ते ७ दिवस तीव्र स्वरूपाचा ताप येतो. डोकेदुखी, सांधेदुखी, स्नायुदुखी असा त्रास होतो. रुग्णास उलट्या होतात. डोळ्याच्या आतील बाजू दुखणे, अंगावर लालसर पुरळ येणे, नाक-तोंड यातून रक्तस्राव होणे, अशक्तपणा, भूक मंदावणे, तोंडाला कोरड पडणे, शौचालयावाटे व उलटीतून रक्त पडणे अशी लक्षणे दिसून येतात.
• प्रतिबंधात्मक उपाय काय कराल ?
घरातील पाण्याचे सर्व साठे आठवड्यातून एकदा रिकामे करावेत, या साठ्यातील आतील बाजू व तळ घासून पुसून कोरडा करून पुन्हा वापरावेत. पाण्याचे साठे घट्ट झाकणाने झाकून ठेवावेत. आपल्या घराभोवती पाणी साचू देऊ नका. अंगण व परिसरातील खड्डे बुजवत रहा. त्यात पाणी साचणार नाही, याची खबरदारी घ्या. झोपताना पूर्ण अंगभर कपडे घालावेत, पांघरून घेऊन झोपावे, तसेच खबरदारीचे इतर उपाय करणे गरजेचे आहे.
• आरोग्य विभाग काय करतेय ?
भविष्यात डेंग्यू ताप आजाराचा उद्रेक होऊ नये, म्हणून आरोग्य विभागामार्फत कंटेनर सर्व्हेत आढळलेल्या भांड्यामध्ये औषधी टाकली जातात. ताप असलेल्या रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेणे, डेंग्यू व चिकनगुनियाकरिता रक्तजल नमुना घेणे, आरोग्य शिक्षण देणे आदी प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात येत आहे. डेंग्यू, ताप आजाराची तपासणी व उपचार सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयात मोफत उपलब्ध आहेत.