‘डिजिटल अरेस्ट’ सांगून आयटी अभियंत्याला ₹६ कोटींना फसवलं!

तुमच्यावर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल आहे अशी थाप मारून डिजिटल अरेस्टच्या नावाखाली एका नामांकित आयटी कंपनीच्या पाषाण येथील रहिवासी आयटी अभियंत्यालाच सायबर चोरट्यांनी ६ कोटी २९ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चोरट्यांनी आणखी ६० लाख • रुपयांची मागणी केली, परंतु हा प्रकार मुलीस समजल्यानंतर तिने वडिलांना फसवणूक झाल्याचे लक्षात आणून दिल्याने अभियंत्याचे उर्वरित पैसे वाचले. याप्रकरणी ५९ वर्षीय अभियंत्याने शिवाजीनगर येथील सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ९ ते ११ नोव्हेंबर या कालावधीत घडला आहे. ज्येष्ठ अभियंता हे शहरातील एका नामांकित आयटी कंपनीत नोकरी करतात. त्यांना सेवानिवृत्तीला काही महिनेच शिल्लक राहिलेले आहेत. ९ नोव्हेंबर रोजी सायबर चोरट्यांनी त्यांना व्हॉट्स्अपद्वारे संपर्क केला. त्यांना पोलिस असल्याची बतावणी केली.