दिव्यांगांच्या रोजगारासाठी सामंजस्य करार करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दिव्यांग युवक-युवतींना रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षित करण्याकरिता युथ फॉर जॉब्स या संस्थेशी राज्य सरकार लवकरच सामंजस्य करार करणार आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी ही माहिती दिली. राज्यातील दिव्यांगांना कौशल्ययुक्त प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगारासाठी आगामी पाच वर्षांत नोंदणीकृत दिव्यांगांना युडीआयडी देण्यात येतील. संस्थेच्या संस्थापिका तथा अध्यक्ष मीरा शेणॉय यांच्या संस्थेने केंद्र शासनाच्या सहकार्याने गडचिरोली जिल्हा प्रशासनासोबत दिव्यांग युवांना रोजगारवाढीसाठी उत्कृष्ट काम केले आहे. ‘युथ फॉर जॉब्स’ ही संस्था पहिल्या टप्प्यात विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात शासनास सहकार्य करणार आहे. ज्या व्यक्ती दिव्यांग आहेत त्यांचे दिव्यांगत्व लक्षात घेऊन त्यांना प्रशिक्षण दिले जाते. रोजगार मेळावे आयोजित करून दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार उद्योग क्षेत्रातील मागणी लक्षात घेऊन आवश्यक असे मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाते, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.