यंदाच्या दिवाळी खरेदीचा उत्साह गगनपार!
अहिल्यानगर : दिवाळीचा सण अवघ्या दहा ते बारा दिवसांवर आला आहे. रविवारच्या सुटीची संधी साधून अहिल्यानगर शहरातील बाजारपेठेत नागरिकांनी खरेदीचा आनंद लुटला. कपड्यांची दालने रविवारी हाऊसफुल्ल होती. किराणा दुकाने, विविध सुपर मार्केट, इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दुकानांत गर्दी पाहायला मिळाली. शहरातील कपड्यांच्या दालनात नवा माल आला असल्याने ग्राहकांच्याही खरेदीसाठी उड्या पडल्या आहेत. यंदाचे दिवाळीचे पर्व २८ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. एकादशी आणि बसुबारस एकाच दिवशी आहे. खरेदीसाठी भरपूर वेळ मिळावा म्हणून रविवारी नागरिकांनी बाजारात गर्दी केली. विविध वस्त्रदालनांत वैविध्यपूर्ण कपडे आले आहेत. साड्यांच्या दालनांतही महिलांची गर्दी होती. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच खरेदी करताना दिसून आले. दिवाळीनिमित्त आकाशकंदील, पणत्या, दिवे विक्रीस आले आहेत. आकर्षक विद्युतमाळांनी दुकाने सजली आहेत. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या दालनांतही विविध वस्तूंसाठी पसंती दिली जात आहे. खास दिवाळीनिमित्त अहिल्यानगर शहरात नवीन दालने सुरू झाली आहे. तिथेही मोठी गर्दी पाहायला मिळली. पारंपरिक कपड्यांसोबतच नव्या ट्रेंडच्या कपड्यांनाही ग्राहकांकडून पसंती दिली जात आहे.