वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून डॉक्टरांची आत्महत्या

डॉ. शेळके यांना न्याय मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही..!

अहमदनगर
                 अहमदनगर जिल्ह्यातील,  पाथर्डी तालुक्यातील , करंजी मधील कोरोना लसीकरण उपकेंद्रावर कार्यरत समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. गणेश शेळके यांनी काल आत्महत्या केली.  प्रशासनाच्या हेतुपुरस्सर जाणून बुजून दिल्या जाणाऱ्या त्रासाला कंटाळून आयुष्य संपवल्याचे त्यांनी सुसाईड नोट मध्ये नमूद केले आहे. वरिष्ठ अधिकारी जाणूनबुजून त्यांना लक्ष करत असत. कोरोना काळात केल्या गेल्या कामाचा प्रोत्साहन भत्ता ही  डॉ. गणेश शेळकेंना  मिळाला नव्हता.

 

 

       तसेच त्यांचा तीन महिन्याचा पगार ही जाणूनबुजून रोखून ठेवला असल्याचे त्यांनी सुसाईड नोट मध्ये लिहिले आहे. डॉ. गणेश शेळकेयांच्या मृत्यूला तालुका आरोग्य अधिकारी ,तसेच तहसीलदार आणि जिल्हाधिकारी हे जबाबदार आहेत. या पार्श्वभूमीवर डॉ. गणेश शेळके यांना न्याय मिळावा या मागणीसाठी सर्व आरोग्य समुदाय च्या वतीने पालकमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी डॉ. शैलेश पवार, डॉ. संदीप गायकवाड, अजय पठारे, डॉ. जयदीप काळे, आणि संकेत पोटे या पाच जणांच्या शिष्टमंडळाने मुश्रीफ यांना, जिल्हाधिकारी कार्यालयात  निवेदन दिले.

 

        डॉ. गणेश शेळके यांच्या मृत्यूला जबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिष्टमंडळाच्या वतीने  करण्यात आली आहे. मुश्रीफ यांनी ही या प्रकरणी तात्काळ कारवाई चे  आदेश दिले. या प्रसंगी आरोग्य समुदाय चे सर्व आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टर्स जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपस्थित होते.