गैरप्रकार रोखण्यासाठी ३६ ड्रोन ठेवणार नजर
अहिल्यानगर : निवडणुकीतील जाहीर प्रचार संपल्यानंतर पुढील ७२ तासांत अनेक घडामोडी घडतात. गुप्त प्रचाराच्या नावाखाली राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडून मतदारांना प्रलोभन देण्याचा प्रयत्न केला जातो. मरंतु गत लोकसभा निवडणुकीचा अनुभव विचारात घेऊन जिल्हा निवडणूक शाखा आणि पोलिस प्रशासन अलर्ट मोडवर राहणार असून, जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघात ड्रोनद्वारे नजर ठेवली जाणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी मागील पंधरा दिवस उमेदवारांकडून आरोप-प्रत्यारोप करत जोरदार प्रचार केला जात होता. सोमवारी सायंकाळी ६ वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर आता मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा निवडणूक शाखेचे कर्मचारी आज मतदान केंद्रावर पौहोचणार आहेत. जिल्ह्यातील १२ मतदारसंघात ३ हजार ७६५ मतदान केंद्रांवर बुधवारी मतदान होणार असून, ३७ लाख ८३ हजार ९८७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये १९ लाख ४६ हजार ९४४ पुरुष, १८ लाख ३६ हजार ८४१ महिला, तर २०२ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.
जिल्हा निवडणूक शाखेकडून मतदारांना आपले मतदानाचे केंद्र, यादीतील क्रमांक, आदींची माहिती असलेल्या ९९.३७ टक्के मतदार चिठ्ठयांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच मतदारांना कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये म्हणून प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामध्ये स्त्री-पुरुष मतदारांसाठी स्वतंत्र रांगा, रांगेत गर्दी झाल्यास
बसण्यासाठी बेंचेस, खुर्चा, प्रतीक्षालय, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, वैद्यकीय सुविधा, वयोवृद्ध नागरिक आणि दिव्यांगासाठी व्हीलचेअर आदी सुविधा देण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली.
◈ २१ हजार ५७४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती जिल्ह्यातील १२ मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार
पाडण्यासाठी २१ हजार ५७४ अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये ३८८ सेक्टर ऑफिसर, २१० सूक्ष्म निरीक्षक, ४ हजार १६८ केंद्राध्यक्ष, ४ हजार १६८ प्रथम मतदान अधिकारी, ८ हजार ४७२ इतर मतदान अधिकारी, तर ४ हजार १६८ शिपाई यांचा समावेश आहे.
◈ ३६ ड्रोन तैनात असणार
जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी सांगितले की, पुढील दोन दिवसांत कोणत्याही प्रकारच्या अवैध प्रकार होत असल्याचे आढळून आल्यास मतदारांना सी-व्हिजिल अॅपवर तक्रार नोंदवता येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात पैसे वाटप, गर्दी किंवा संशयास्पद हालचालींवर टिपण्यासाठी दोन ते तीन ड्रोनद्वारे नजर ठेवली जाणार आहे. १२ विधानसभा मतदारसंघात ३६ ड्रोन तैनात असणार आहेत.
◈ ५० टक्के केंद्रावर वेब कास्टिंग
जिल्ह्यातील ३ हजार ७६५ मतदान केंद्रांपैकी ५० टक्के मतदान केंद्रावर वेब कास्टिंग केली जाणार आहे. अहमदनगर शहर मतदारसंघात सर्वच २९७ केंद्र तर इतर ११ मतदारसंघांतील निम्म्या मतदान केंद्रावर वेब कास्टिंग असणार आहे.