ई-मतदार शपथ घ्या; उत्सवात सहभागी व्हा! -जिल्हाधिकारी सालीमठ

ऑनलाइन शपथ घेतल्यावर मिळणार प्रमाणपत्र

अहिल्यानगर : विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोग, विशेष अभियान राबवित आहे. यासाठी अहिल्यानगर जिल्हा स्वीप समिती पुढाकार घेऊन ई-मतदार शपथ घ्या व शासकीय प्रमाणपत्र प्राप्त करा, असा ऑनलाइन उपक्रम राबवत आहे. या अभिनव लोकचळवळीत मतदारांनी सहभागी होऊन लोकशाहीचा उत्सव यशस्वी करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील ३७ लाख मतदारांपर्यंत मतदार जनजागृती अभियान नेण्यासाठी ई-मतदार शपथ तयार करण्यात आली असून, आतापर्यंत सुमारे पाऊण लाख मतदारांना जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या सहीचे ऑनलाइन प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. जिल्ह्यातील नागरिक सोशल मीडियावर हे प्रमाणपत्र शेअर करताना दिसत आहेत. जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी या विश्वविक्रम उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रमाणपत्रामुळे उपक्रमास प्रतिसाद लाभत आहे, अशी माहिती स्वीम नोडल अधिकारी तथा शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी दिली. उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, शिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे, उपशिक्षणाधिकारी आकाश दरेकर, मीना शिवगुंडे, जयश्री कार्ले, डॉ. अमोल बागूल आदींनी सहकार्य केले आहे.

◈ येथून मिळवा प्रमाणपत्र

ई-मतदार शपथेची अहिल्यानगर जिल्ह्यासाठी https://www.evoterpledgeahilyanagar.com/ ही लिंक असून, या लिंकचा क्यूआर कोडदेखील उपलब्ध आहे. लिंक ओपन केल्यावर स्वतःचे, तालुक्याचे, गावाचे नाव ही माहिती भरल्यानंतर शपथ प्रमाणपत्र प्राप्त होते. प्रमाणपत्रावर मतदान तारीख २० नोव्हेंबर, मतदान केंद्र शोधा व मतदार यादीत नाव शोधा याविषयीचे दोन कोड व घोषवाक्ये आहेत.