तब्बल 16 वर्षानंतर नगर जिल्ह्याचा फुटबॉल संघ उपांत्यपूर्व फेरीत दाखल

महाराष्ट्र राज्य ज्युनियर आंतरजिल्हा फुटबॉल चॅम्पियनशिप

अहिल्यानगर – वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (महाराष्ट्र राज्य) च्या वतीने शिरपूर (जि.धुळे) येथे सुरु असलेल्या महाराष्ट्र राज्य ज्युनियर आंतरजिल्हा फुटबॉल चॅम्पियनशिप (15 वर्षा खालील) फुटबॉल स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्याच्या फुटबॉल संघाने उत्कृष्ट कामगिरी करुन उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. या स्पर्धेसाठी सोमवारी (दि.4 नोव्हेंबर) जिल्ह्याचा संघ रवाना झाला होता. स्पर्धेच्या उद्घाटनाच्या सामन्यात मंगळवारी (दि.5 नोव्हेंबर) नगर जिल्ह्याच्या संघाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या संघावर 5-2 गोलने विजय मिळवला. या सामन्यात विजयी संघासाठी भानुदास चंद याने 3 गोल करून हॅट्रिकची नोंद केली. कर्णधार कृष्णराज टेमकर आणि इशांत आहुजा यांनी 1-1 गोल नोंदवून संघाच्या विजयात महत्वपूर्ण योगदान दिले.

स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात बुधवारी (दि.6 नोव्हेंबर) राज्यातील सर्वोत्कृष्ट संघांपैकी एक असलेल्या नाशिक जिल्ह्याच्या संघाबरोबरील सामन्यात सुरुवातीला 2-0 आणि मध्यंतरानंतर 3-1 गोलने पिछाडीवर असताना सामना संपण्यास अवघी काही मिनिटे शिल्लक असताना अहमदनगर संघाने 2 गोलची पिछाडी भरून काढत सामना टाय ब्रेकर मध्ये नेला. निर्धारित वेळेत अहमदनगर संघासाठी भानुदास चंद याने 2 गोल आणि अशोक चंद याने 1 गोलची नोंद केली. टाय ब्रेकरमध्ये संघासाठी स्वराज आडेप, माहीर गुंदेचा, भानुदास चंद आणि कृष्णराज टेमकर यांनी गोल नोंदवले. कर्णधार कृष्णराज टेमकर याने बदली गोलरक्षकाची भूमिका निभावताना नाशिक संघाच्या 2 पेनल्टी किक रोखून संघास विजयी केले. सामन्याअंती अहिल्यानगर संघाने नाशिक संघाचा टायब्रेकरमध्ये 4-3 असा पराभव करून स्पर्धेच्या पुढील फेरीत प्रवेश केला. गुरुवारी (दि.7 नोव्हेंबर) स्पर्धेच्या उप-उपांत्यपूर्व फेरीमध्ये नगर जिल्ह्याच्या संघाने सोलापूर जिल्हा संघाचा 5-0 गोल फरकाने एकतर्फी पराभव करून स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला आहे.

विजयी संघासाठी भानुदास चंद याने स्पर्धेतील दुसऱ्या हॅट्ट्रीकची नोंद करताना 3 गोल आणि कर्णधार कृष्णराज टेमकर याने 2 गोल मारून संघास विजयी केले. संघाचा पुढील सामना नागपूर जिल्हा संघाबरोबर शुक्रवारी (दि.8 नोव्हेंबर) होणार आहे. तब्बल 16 वर्षानंतर ज्युनिअर बॉईज स्टेट चॅम्पियनशिप (15 वर्षांखालील) या कॅटेगरीमध्ये जिल्ह्याच्या संघाने उपांत्यपूर्व फेरीत टॉप 8 पर्यंत मजल मारली आहे. स्पर्धेपूर्वी 15 दिवस निवड चाचणी व प्रशिक्षण शिबीर आणि संघाला प्रत्यक्ष सामने खेळण्याचा अनुभव मिळावा म्हणून, शहरातील विविध क्लबच्या वरिष्ठ संघांबरोबर मैत्रीपूर्ण सामन्यांचे आयोजन करण्यासाठी अहमदनगर जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव रोनप फर्नांडिस यांनी अथक परिश्रम घेतले. जिल्हा संघाचे निवड समिती सदस्य व्हिक्टर जोसेफ, राजेंद्र पाटोळे व संघाचे प्रशिक्षक जेव्हिअर स्वामी व सहप्रशिक्षक वैभव मनोदिया यांनी उत्तम कामगिरी बजावली आहे. संघाच्या या यशाबद्दल अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज वाळवेकर, उपाध्यक्ष खालिद सय्यद, जोगासिंह मिन्हास, सहसचिव प्रदीप जाधव, खजिनदार रिशपालसिंह परमार, सह खजिनदार रणबीरसिंह परमार यांनी संघातील सर्व सहभागी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील सामन्यांसाठी शुभेच्छा दिल्या.