सावेडीमध्ये संघर्ष प्रतिष्ठान ट्रस्टचा गणेशोत्सव दणक्यात! धार्मिक + सामाजिक उपक्रमांनी रंगली उत्सवाची शान
श्री गणरायाच्या पावन उपस्थितीत सत्यनारायण महापूजा पार पडली.
Share
सावेडीमध्ये संघर्ष प्रतिष्ठान ट्रस्टचा गणेशोत्सव दणक्यात! धार्मिक + सामाजिक उपक्रमांनी रंगली उत्सवाची शान
अहिल्यानगर (प्रतिनिधी) – सावेडीतील श्रमिकनगर परिसर या दिवसांत गणेशभक्तीने उजळून निघाला आहे. संघर्ष प्रतिष्ठान ट्रस्टतर्फे यंदाही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून, आकर्षक गणेश मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेनंतर धार्मिक आणि सामाजिक अशा विविध उपक्रमांनी वातावरण मंगलमय झाले आहे.
श्री गणरायाच्या पावन उपस्थितीत सत्यनारायण महापूजा पार पडली. यजमान म्हणून श्री. अरविंद मिठापेल्ली व सौ. मिठापेल्ली यांनी पूजाविधी पार पाडला, तर पौराहित्य कोडमपंतलू यांनी केले. महापूजनंतर हजारो भाविकांनी दर्शन घेतले आणि पुरी-भाजीचा स्वादिष्ट महाप्रसाद मोठ्या भक्तिभावाने स्वीकारला.
सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धा ठरल्या आकर्षणाचा केंद्रबिंदू
गणेशोत्सव म्हटलं की उत्साह आणि रंगतदार स्पर्धा ओघाने येतातच. संघर्ष प्रतिष्ठान ट्रस्टतर्फे यंदाही लिंबू-चमचा , संगीत खुर्ची , रांगोळी , वन मिनिट शो, चित्रकला , स्लो सायकलिंग अशा धमाल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच वयोगटातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळतोय. मुलांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळतोय आणि परिसरात उत्सवाचे खरे रंग खुललेत.
सामाजिक कार्यातही आघाडीवर
संघर्ष प्रतिष्ठान ट्रस्ट केवळ धार्मिक सोहळ्यापुरता मर्यादित नसून वर्षभर अनेक उपक्रम राबवत असते. रक्तदान शिबिर , वृक्षारोपण , आरोग्य तपासणी शिबिरे या माध्यमातून सामाजिक जबाबदारीही निभावत आहे. समाजातील प्रत्येक घटकाला प्रोत्साहन देऊन समाज बांधणीचा आदर्श घडवण्याचे काम हे मंडळ सातत्याने करत आहे.
या सोहळ्यास नगरसेवक मनोज दुलम व सामाजिक कार्यकर्ते करण कराळे यांनी भेट देऊन मंडळाच्या कार्याचे कौतुक केले आणि त्यांचा मान्यवर सत्कारही झाला.
परिसरात उत्साहाचं वातावरण
यंदाच्या गणेशोत्सवाला प्रचंड प्रतिसाद लाभला आहे. नागरिक, लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत, सर्वच जण गणेशोत्सवात सहभागी होत असल्याने श्रमिकनगरात उत्सवाचे खरे स्वरूप दिसत आहे. संघर्ष प्रतिष्ठान ट्रस्टचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते दिवस-रात्र परिश्रम घेऊन हा उत्सव अविस्मरणीय बनवत आहेत.
या उत्सवामुळे धार्मिकतेसोबतच सामाजिक बंध वाढलेत आणि खरी एकात्मतेची अनुभूती मिळाली आहे. गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या!