जर्मनीत नोकरी करण्यास इच्छूक तरूण आणि शिक्षकांनी शासकीय संकेतस्थळावर नोंदणी करावी !

संगमनेर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे आवाहन

जर्मन देशात जाऊन नोकरी करण्यास इच्छूक व्यावसायिक पात्रताधारक तरूण व जर्मन भाषा शिकविण्यासाठी प्रशिक्षक म्हणून काम करण्यास ‌इच्छूक शिक्षकांनी शासनाच्या संकेतस्थळावर जाऊन नाव नोंदणी करावी. असे आवाहन संगमनेर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ.राजेश बनकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेले कुशल मनुष्यबळ आणि अन्य प्रगत युरोपियन देशांमध्ये त्यांची असणारी कमतरता या पार्श्वभूमीवर राज्यातील युवकांना युरोपियन देशांमध्ये नोकरी व रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत, ही बाब विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाने जर्मन देशातील ‘बाडेन बुटेनबर्ग’ या राज्याशी कुशल मनुष्यबळ प्रशिक्षित करून उपलब्ध करून देणे याबाबत सामंजस्य करार केला आहे. त्याचबरोबर जर्मन भाषा शिकविण्यासाठी ग्योथे इन्स्टिट्यूट, मॅक्सम्युलर भवन, पुणे व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत पात्र उमेदवारांना आवश्यक ते जर्मन भाषेचे प्रशिक्षण व आवश्यक असल्यास अधिकचे कौशल्य विकास प्रशिक्षण शासनामार्फत मोफत स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे. 

जर्मनी देशात नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्यां व सदर उपक्रमांतर्गत निवडलेल्या पदाचे व्यावसायिक कौशल्य प्राप्त अहमदनगर जिल्ह्यातील उमेदवारांनी  https://maa.ac.in/GermanyEmployment/ या संकेतस्थळावर आपली नाव नोंदणी करावी. सदर उपक्रमातील कौशल्या संदर्भात सद्यस्थितीमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रम शिकत असणारे विद्यार्थी या उपक्रमासाठी नोंदणी करण्यास पात्र नाही याची नोंद घ्यावी. अशा विद्यार्थ्यांनी नोंदणी करू नये. या उपक्रमामधील नोंदणी केलेल्या उमेदवारांना जर्मन भाषा शिकविण्यासाठी जिल्हास्तरावर प्रशिक्षण वर्ग सुरु करणे प्रस्तावित आहे. या प्रशिक्षण वर्गासाठी प्रशिक्षक म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांसाठी जर्मन भाषेचे प्रशिक्षण वर्ग शासनामार्फत मोफत सुरु करणे प्रस्तावित आहे. असे प्रशिक्षण घेऊन या उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात इच्छुक असणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील फक्त शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमधील शिक्षकांनी 
https://maa.ac.in/GermanyEmployment/teacher-germany-employement.php या  लिंकवर जाऊन नाव नोंदणी करावी, असे आवाहन श्री.बनकर यांनी केले आहे.