गोदावरी खोरे दुष्काळमुक्त करण्यास प्राधान्य देणार; राधाकृष्ण विखे पाटील
शिर्डी : गोदावरी खोरे दुष्काळमुक्त करण्याचे मोठे काम जलसंपदा विभागाच्या माध्यमातून करतानाच निळवंडे धरणाच्या वितरकांचे काम पूर्ण करण्यास आपले प्राधान्य असेल, अशी ग्वाही जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. मंत्रिपदाची शपथ आणि जलसंपदा विभागाची जबाबदारी मिळाल्यानंतर विखे पाटील यांनी शिर्डी येथे श्रीसाईबाबा मंदिरात येऊन दर्शन घेतले. संस्थानच्या वतीने तसेच सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, माजी नगराध्यक्ष अभय शेळके, भाजपाचे शहराध्यक्ष सचिन शिंदे, प्रांताधिकारी माणिक आहेर, तहसीलदार अमोल मोरे, वैभव कलुबर्मे यांनी स्वागत करून मंत्री विखे पाटील यांचा सत्कार केला. माध्यमांशी बोलताना जलसंपदा मंत्री विखे पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या जबाबदारीचे आव्हान मोठे असले तरी त्यांनी केलेला संकल्प पूर्ण करण्याचे यशस्वी काम आपण करणार आहोत. गोदावरी खोरे दुष्काळमुक्त करण्यासाठी लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी महाराष्ट्र पाणी परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले होते. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे दायित्व आता आपल्यावर आले आहे. हे काम खूप मोठे आहे; पण केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यात वळविण्यासाठी महायुती सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण करण्याची जबाबदारी घेतली असल्याचे विखे पाटील म्हणाले.महायुती सरकारच्या माध्यमातून निळवंडे धरणाचे काम पूर्ण होऊ शकले. दोन्ही कालव्याच्या माध्यमातून जिरायती भागाला पाणी मिळवून दिले असले तरी अजून वितरकांची कामे पूर्ण करायची आहेत. आता जलसंपदा विभागाची जबाबदारी मिळाल्याने ही कामे पूर्ण करण्यास आपले प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले. कृष्णा खोरे हा सुद्धा मोठा विभाग असून पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा जिल्ह्यातील गावात दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे या गावांना पाणी देणे हे सुद्धा मोठे काम आपल्याला करायचे असून या पट्ट्यात असलेल्या जिल्ह्यांचे पाणी प्रश्न सोडविण्याकरिता काम करणे हेच आषले उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.