सोने- चांदी पुन्हा स्वस्त 

८००० रुपयांनी भावात घसरण 

नवी दिल्लीः

सोन्या-चांदीच्या दरातील घसरण अद्यापही सुरूच आहे. ऑगस्टमध्ये सोन्याचे भाव प्रतिदहा ग्रॅम 56,379 रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचले होते, जे आता प्रतिदहा ग्रॅमसाठी घसरून सुमारे 48,487 रुपयांवर आले आहेत. कोरोना लसीच्या बातमीमुळे गुंतवणूकदारांना सोन्याच्या ऐवजी इक्विटी बाजारातील गुंतवणूक अधिक सुरक्षित वाटत आहेत. ज्यामुळे जागतिक स्तरावर सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण झाली आहे, त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारावरही दिसून येतो आहे.

प्रति 10 ग्रॅम सोने 48000 रुपयांच्या पातळीवर
सोन्याचे भाव शुक्रवारी सुरुवातीच्या व्यापारात प्रतिदहा ग्रॅम 48,487 रुपयांवर आले. एमसीएक्सवर व्यापार करताना सोन्याच्या किमती दहा ग्रॅमसाठी 48415 रुपये एवढ्या घसरल्या आहेत. ऑगस्टपासून आतापर्यंत सोने जवळपास तोळ्यासाठी 8 हजार रुपयांनी स्वस्त झालं आहे.

चांदीतही घसरण सुरूच

सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही घसरण होत असल्याची चित्र आहे. शुक्रवारी सुरुवातीच्या व्यापारात एमसीएक्सवरील चांदीचे दर घटून 59,438 रुपये प्रतिकिलोवर आले आहेत. तर ऑगस्ट महिन्यात एक किलो चांदीची किंमत सुमारे 79000 हजार रुपये होती. चांदीच्या घसरणीविषयी बोलताना ऑगस्टपासून किंमत 20,000 रुपयांनी खाली आली आहे.


परकीय बाजारातही घसरण

परदेशी बाजारातही सोन्या-चांदीच्या किमतींचा कल कायम आहे. कॉमेक्सवरील सोन्याचे दर 1.80 डॉलर प्रति औंससह 1813 डॉलरवर व्यापार करीत आहेत. चांदीबद्दल बोलायचे झाल्यास प्रति औंस सुमारे 3 डॉलरची घट दिसून आली आहे. सध्या चांदी 23.15 डॉलर प्रति औंसवर व्यापार करीत आहे. लॉकडाऊन काळात सोन्याची दुकानं बंद होती, तर सोन्याचा व्यापारही ठप्प होता. पण आता मोठ्या उत्साहात मार्केट सुरू झालं आहे. अशात लग्न सराईचे दिवस आहेत. त्यामुळे सोनं खरेदीला यंदा लोकांनी जास्त पसंती दिली आहे.

दिवाळीतही लोकांनी मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केलं आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने  दिलेल्या माहितीनुसार, 2020 मध्ये दिवाळीच्या उत्सवात लोकांनी 20,000 कोटी रुपयांच्यां सोन्याची खरेदी केली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या आकडेवारीनुसार, देशभरात धनत्रयोदशीच्या दिवशी तब्बल 40 टन सोन्याची विक्री झाली, ज्याची किंमत 20,000 कोटींच्या घरात आहेत. दरम्यान, सोन्याच्या किमतींनी 56,000 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली होती. त्यानंतर आता पुन्हा भाव खाली येताना दिसत आहेत. पण कोरोनामुळे किंमत पुन्हा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आताच लोकांचा सोनं खरेदीकडे कल आहे.