पाकिस्तानमधून परतलेली गीता मराठवाडा आणि तेलंगणामध्ये एका कुटुंबाचा शोध घेणार…

आनंद सेवा सोसायटी करणार गीताची मदत 

इंदौर : 
जवळपास पाच वर्षांपूर्वी पाकमधून भारतात परतलेली मूक-बधिर तरुणी गीता आपल्या कुटुंबाच्या शोधात मराठवाडा आणि तेलंगणच्या दौऱ्यावर येणार आहे. आठवडाभराचा तिचा हा दौरा २ डिसेंबर पासून सुरु होणार आहे. दोन दशकांपूर्वी कुटुंबापासून ताटातूट झाल्याने लहान पणीच ती चुकीने थेट पाकिस्तानात पोहोचली होती. या नंतर  २०१५ साली तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या विशेष प्रयत्नांमुळे भारतात परतणारी गीता चर्चेचा विषय ठरली होती.

मध्यप्रदेशच्या सामाजिक न्याय आणि दिव्यांग लोककल्याण विभागाच्या एका अधिकाऱ्यानुसार, दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या इंदौरमधील आनंद सेवा सोसायटीकडून गीताची काळजी घेतली जातेय. या स्वयंसेवी संस्थेवरचा गीताच्या आई वडिलांना शोधण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. ३० वर्षीय गीताने इशाऱ्याद्वारे आपण राहत असलेल्या भागांसंबंधी काही संकेत दिले आहेत. त्या नुसार मराठवाडा आणि तेलंगणाच्या परिसरात तिचे घर असण्याची  दाट शक्यता  आहे. त्यामुळे सांकेतिक कड्या जोडत आम्ही तिचे कुटुंब शोधण्यासाठी या भागांच्या दौऱ्यावर निघणार आहोत, असे संचालक आणि सांकेतिक भाषा तद्न्य जानेंद्र पुरोहित यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.

 

लहानपणीच्या  आपल्या पुसट  आठवणींद्वारे गीताने आपल्या गावाजवळ एक रेल्वेस्थानक आणि गावातील नदीच्या किनाऱ्यावर एक देवीचे मंदिर असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे सुरुवातीला गीताला नांदेड, परभणी आणि जालना जिल्ह्यातील रेल्वे स्थानक असणाऱ्या परिसरात आणले जाणार आहे. या नंतर मराठवाड्याला लागून असलेल्या तेलंगणा मध्ये तिचं कुटुंबाचा शोध घेतला  जाईल. आठवडाभराचा हा दौरा रेल्वे आणि रस्ते मार्गाने होणार आहे. या दौऱ्यात मध्यप्रदेश महिला पोलिसांची  एक  तुकडी गीता सोबत असणार आहे. शिवाय प्रवासामध्ये स्थानिक पोलिसांची देखील मदत घेतली जाणार  आहे.