आयसीसीचे नवे अध्यक्ष होऊ शकतात जय शाह ; अर्जाची शेवटची तारीख २७ ऑगस्टपर्यंत
जय शाह हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) अध्यक्ष होऊ शकतात. आयसीसी ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट संस्था आहे. आयसीसीचे विद्यमान अध्यक्ष ग्रेग बर्कले यांनी तिसऱ्या कार्यकाळासाठी नकार दिला आहे. त्यांचा कार्यकाळ ३० नोव्हेंबरला संपत आहे. आता नव्या अध्यक्षासाठी निवडणूक होणार आहे. अशा वेळी बीसीसीआयचे सचिव शाह यांची या पदावर निवड होऊ शकते, अशी चर्चा आहे. शाह हे आयसीसीच्या बोर्ड रुममधील सर्वात प्रभावशाली चेहऱ्यांपैकी एक मानले जातात. ते आयसीसीच्या सर्वात शक्तिशाली ‘फायनान्स अँड कमर्शियल अफेअर्स’च्या उपसमितीचे प्रमुखदेखील आहेत. बोर्डात मतदान करणाऱ्या सर्व १६ सदस्यांसोबत त्यांचे चांगले संबंध असल्याचे म्हटले जाते. अशा वेळी त्यांनी दावेदारी केल्यास ते जिंकण्याची पूर्ण शक्यता आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख २७ ऑगस्टपर्यंत आहे. अशा परिस्थितीत शाह यांच्या निर्णयासाठी तोपर्यंत वाट पाहावी लागेल. आयसीसीचे सर्वात तरुण अध्यक्ष ३५ वर्षीय शाह यांची या पदावर निवड झाल्यास ते आयसीसीच्या इतिहासातील सर्वात तरुण अध्यक्ष असतील. यापूर्वी भारताचे जगमोहन दालमिया, शरद पवार, एन. श्रीनिवासन आणि शशांक मनोहर यांनीही आयसीसीचे नेतृत्व केले आहे.