रक्षाबंधनानिमित्त अहमदनगर जिल्हा स्वीप समितीचा उपक्रम मतदारदूत डॉ.अमोल बागुल यांनी बनवली “लोकशाही राखी”

अहमदनगर : जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, अहमदनगर यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने मतदार नोंदणी तसेच जनजागृतीसाठी जिल्हा मतदारदूत डॉ.अमोल बागुल यांच्या संकल्पनेतून रक्षाबंधनानिमित्त “लोकशाही राखी ” तयार करण्यात आली आहे. यावर भारत निवडणूक आयोगाच्या मतदार नोंदणीच्या वेबसाईटचा क्यु आर कोड तयार करून डकवण्यात आला आहे. मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांच्या मार्गदर्शनानुसार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम २०२४ (दुसरा) राज्यभरात चालू असून अहमदनगर जिल्हा स्वीप समितीच्या मार्गदर्शनातून लोकशाही राखी तयार करण्यात आली आहे.या वैशिष्ट्यपूर्ण राखीवर भारतीय ध्वजासह क्यू आर कोड डकवण्यात आला आहे. या उपक्रमासाठी उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी शाहूराज मोरे, स्वीप नोडल अधिकारी तथा शिक्षणाधिकारी अशोक कडूस, स्वीप नोडल अधिकारी तथा उपशिक्षणाधिकारी मीना शिवगुंडे, स्वीप नोडल अधिकारी तथा उपशिक्षणाधिकारी आकाश दरेकर, तहसीलदार प्रदीप पाटील, नायब तहसीलदार प्रशांत गोसावी व सर्व स्वीप समिती सदस्य आदींचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे.

सुमारे ५०० लोकशाही राख्या तयार करण्यात आल्या असून बहिणीने भावाला बांधलेल्या राखीवरील हा क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर भारत निवडणूक आयोगाची वेबसाईट खुली होते व यावरील सामान्य मतदारांसाठी नवीन नोंदणी-अर्ज क्रमांक सहा,परदेशी मतदारांसाठी नवीन नोंदणी-अर्ज क्रमांक सहा-अ, मतदार यादीतील नावाचा प्रस्तावित समावेश अथवा हटवण्याबाबत आक्षेप अर्ज क्रमांक सात, निवासस्थानामध्ये स्थलांतर’ विद्यमान मतदार यादी मधील नोंदी दुरुस्त करणे, मतदार ओळखपत्र बदलणे, दिव्यांग यादीचे चिन्हांकन अर्ज क्रमांक आठ, आधार कार्ड मतदान कार्डशी लिंक करणे अर्ज क्रमांक सहा ब, तसेच मतदार यादीत नाव शोधणे, ई-इपिक डाऊनलोड करणे, स्वतःचे मतदान केंद्र आणि मतदान अधिकारी जाणून घेणे, विधानसभा संसदीय मतदार संघाचा तपशील, बीएलओ निवडणूक अधिकारी तपशील तसेच भारत निवडणूक आयोगाचे विविध ॲप इत्यादी गोष्टी फक्त एकाच क्यूआर कोड मध्ये माहिती होतात. मतदार नोंदणी व जनजागृतीच्या उपक्रमासाठी ज्यांना अहमदनगर जिल्हा स्वीप समितीच्या माध्यमातून निर्मित लोकशाही राखी हवी असेल त्यांनी ‘९००२१०९००३’ या देशातील पहिल्या अहमदनगर स्वीप केअर व्हॉटसअप क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.