महाकुंभमेळ्याला सुरुवात ; पहिले शाही स्नान आज
जगातील सर्वांत मोठा धार्मिक महोत्सव अशी ओळख असणाऱ्या कुंभमेळ्याची सोमवार पासून सुरूवात होणार आहे. प्रयागराज येथील गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या संगमावर उद्या (ता. १३) पौष पौर्णिमेनिमित्त पहिले शाही स्नान संपन्न होणार आहे. विविध आखाड्यांचे प्रमुख, नागा साधू आणि लक्षावधी भाविक उद्या संगमात पहिले शाही स्नान करणार आहेत. सुमारे १४४ वर्षांपूर्वी झालेल्या कुंभमेळ्यावेळी जी ग्रहस्थिती होती ती ग्रहस्थिती यंदाच्या कुंभमेळ्यावेळी असल्याने या पर्वाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळेच यंदा ३५ ते ४० कोटी भाविक आणि पर्यटक कुंभमेळ्यात सहभागी होतील असा अंदाज व्यक्त केला जात असून त्या अनुषंगाने उत्तर प्रदेश सरकारने विशेष तयारी केली आहे. कुंभमेळ्याची अधिकृत सुरुवात होण्याआधीच शनिवारी सुमारे २५ लाख भाविकांनी संगमावर स्नान केल्याचे सांगितले जात आहे. “यंदाचा कुंभमेळा हा जसा धार्मिक मान्यतेनुसार विशेष आहे, त्याचप्रमाणे यंदा प्रथमच कुंभमेळ्यामध्ये एआय तंत्रज्ञानासह डिजिटल यंत्रणांच्या वापरावरही विशेष भर देण्यात आला असल्याने हा ‘डिजी’ कुंभमेळाही ठरणार आहे,” असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. १३ जानेवारी ते २५ फेब्रुवारी या कालावधीमध्ये हा कुंभमेळा होणार असून या कालावधीतील ठरावीक दिवशी संगमावरती शाही स्नान होणार आहे.
महाकुंभची महातयारी
■ महाकुंभनगरी ठरणार जगातील सर्वांत मोठी तात्पुरती वसविण्यात आलेली नगरी
■ महाकुंभनगरीत ५० लाख ते १ कोटीच्या आसपास नागरिकांना
सतत राबता असणार
■ कुंभमेळ्यासाठी ५५ पोलिसठाणी आणि ४५ हजार पोलिस तैनात
■ १३ प्रमुख आखाड्यांचे पीठाधीश, महामंडलेश्वर आणि लक्षावधी नागा साधूंचा सहभाग