महाराष्ट्र पोतराज वाजंत्री संघटनेचे मुंबईच्या आझाद मैदानात धरणे!

पोतराज, वाजंत्री यांना लोक कलाकार म्हणून मान्यता मिळावी; शासनाच्या योजनांचा लाभ देण्याची मागणी

अहिल्यानगर – पोतराज व वाजंत्री यांची लोककलाकार म्हणून सरकार दरबारी नोंद घ्यावी आणि शासनाच्या योजनांचा त्यांना लाभ मिळण्याच्या प्रमुख मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानात महाराष्ट्र पोतराज वाजंत्री संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब उडाणशिवे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनात विकास उडाणशिवे, लखन लोखंडे, विशाल वैरागर, लक्ष्मण आकुडे, निखिल गाडे, गणेश गायकवाड, विकास धाडगे, बाळू चांदणे, विकास वाल्हेकर, गणेश गाडे, लखन पवार आदींसह शहरातील पोतराज व वाजंत्री कलाकार सहभागी झाले होते.

पारंपरिक पोतराज व वाजंत्री कलाकार हे घराघरात पोहोचणारे आणि विविध सामाजिक विषयांवर जागृती करणारे कलाकार म्हणून ओळखले जातात. दारूबंदी, हुंडाबंदी, स्वच्छता, महिला भ्रूणहत्या रोखणे अशा अनेक सामाजिक विषयांवर त्यांचे गायन, वादन आणि नृत्य यांद्वारे कार्य सुरु आहे. त्यांच्या कार्याला अधिकृत मान्यता मिळावी व त्यांची लोककलाकार म्हणून सरकार दरबारी नोंद घ्यावी, लोककलाकारांना मिळणाऱ्या शासनाच्या योजनांचा लाभ देण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पोतराज व वाजंत्री कलाकारांसाठी विविध कल्याणकारी योजनांचा लाभ द्यावा, या कलाकारांना मानधन योजनेचा लाभ मिळावा, ओळखपत्र मिळावे आणि सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे महापोर्टलमध्ये नोंदणी करावी, त्याचप्रमाणे, 15 ते 35 वयोगटातील पोतराज व वाजंत्री कलाकारांना 5 हजार रुपये वेतन मिळावे, कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे आणि घरकुलासाठी राखीव कोटा दिला जावा, अशी संघटनेच्या वतीने मागणी करण्यात आली आहे.