माझी लाडकी बहीण योजना; ३ दिवसांत ८४ हजार अर्जाची छाननी
४ हजारपेक्षा जास्त अर्जांमध्ये त्रुटी
अहमदनगर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे काम सध्या शासन स्तरावरून जोरदार पद्धतीने सुरू आहे. महापालिका व जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी तीन दिवसांत ८४ हजार अर्जाची छाननी केली असून, यातील ७९ हजार ९६७ अर्ज पात्र ठरले आहेत. अर्ज आणि जोडलेल्या कागदपत्रांमधील नावात विसंगती, वय न बसणे, रेशन कार्ड, आधार कार्डाची एकच बाजू अपलोड करणे, तसेच बँक खातेक्रमांक अस्पष्ट दिसणे आदी कारणांमुळे ४ हजार ३३ अर्ज अटी पूर्ततेसाठी ठेवण्यात आले आहेत. ज्यांचे अर्ज अपात्र ठरले आहे त्यांना कागदपत्रांची पूर्तता करून पुन्हा अर्ज अपलोड करता येणार असल्याचे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले. योजनेअंतर्गत ८४ हजार अर्ज छाननीसाठी आले होते, यातील काही अर्ज हे जिल्हा परिषदेकडे देण्यात आले होते. मनपाच्या कर्मचाऱ्यांनी ३ व ४ ऑगस्ट या सुटीच्या दिवशीही काम करत तीन दिवसांतच अर्जाची छाननी करत काम पूर्ण केले.
माझी लाडकी बहीण योजना अर्जाची संख्या वाढतेय, लाडकी बहीण योजनेंतर्गत महिला मोठ्या संख्येने अर्ज भरत आहेत. योजनेचा अर्ज भरण्यासाठी आधी ॲप तयार केले होते. आता शासनाने संकेतस्थळ सुरु केले आहे. त्यामुळे दिवसागणिक अर्जाची संख्या वाढत आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने लाभार्थी महिलांच्या खात्यावर योजनेंतर्गत पैसे वर्ग करावयाचे शासनाचे नियोजन असल्याने या कामाला गती देण्यात आली आहे. योजनेंतर्गत ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज भरता येणार असल्याने मनपाकडे छाननीसाठी पुन्हा अर्ज येणार आहेत. अर्जाची तातडीने छाननी केली जाणार असल्याचे उपायुक्त मुंडे यांनी सांगितले. हा अर्ज भरताना या दक्षता घ्या. भरलेला अर्जातील नाव, आधार कार्डवरील नाव व जन्मतारीख, बँकेचे पासबुक, रेशन कार्ड, हमीपत्र आदींची तपासणी करून अर्ज मंजूर केला जातो. त्यामुळे नव्याने अर्ज भरणाऱ्यांनी दिलेल्या सूचना व्यवस्थित वाचून अर्ज भरावेत, असे आवाहन प्रशासनातील अधिकाऱ्यांनी केले आहे.