शहरात नायलॉन मांजाच्या तब्बल २४० रिळ जप्त!

अहिल्यानगर  : रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावरील लोखंडी पुलाजवळील एका गाळ्यातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी १ लाख २० हजार रुपये किमतीच्या नायलॉन मांजाच्या २४० रिळ जप्त केल्या आहेत. रविवारी पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणी दर्शन दिनेश परदेशी (वय २६ रा. सातभाई गल्ली, अहिल्यानगर) याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहिल्यानगर शहरात सर्रास नायलॉन मांजाची विक्री होत आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांसह तोफखाना, कोतवाली, भिंगार कॅम्प पोलिसांकडून विक्रेत्यांवर कारवाई केली जात आहे. लोखंडी पुलाजवळ एका पत्र्याच्या गाळ्यात नायलॉन मांजाची विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. पथकाने छापा टाकला असता दर्शन परदेशी हा नायलॉन मांजा विक्री करत असताना आढळून आला. त्याच्या ताब्यातून २४० रिळ जप्त करण्यात आल्या आहेत.